VIDEO Chhaava Movie In Theatre: अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्यानंतर 5 दिवसांमध्ये जगभरात 230 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सगळीकडेच या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अनेकजण सिनेमगृहातील छोट्या छोट्या क्लिप पोस्ट करत चित्रपट कसा वाटला आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या भावना व्यक्त करत आहे. मात्र, गुजरातच्या भरूच शहरामध्ये चित्रपट पाहताना असा काही प्रकार घडला की एका प्रेक्षकाला थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना असून औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्नाने प्राण फुंकलेत. या चित्रपटाला एवढा प्रतिसाद मिळतोय की महाराष्ट्रात काही ठिकाणी या चित्रपटाची तिकीटं मिळत नसल्याचंही सांगतिलं जात आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाला गर्दी होताना दिसतेय. गुजरामधील अशाच एका चित्रपटगृहामध्ये 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या जयेश वसावा नावाच्या प्रेक्षकाला संभाजी महाराजांवर झालेल्या अत्याचारांची दृश्यं पाहताना भावना अनावर झाल्या. संतापलेला जयेश चित्रपटगृहमधील स्क्रीनजवळ गेला आणि त्याने चित्रपट सुरु असताना चित्रपटगृहातील पडदाच फाडला.
रविवारी सायंकाळी आर. के. सिनेमा येथे 'छावा' चित्रपटाचा शो पाहण्यासाठी आलेला जयेश वसावा क्लायमेक्सच्या सीनच्या वेळी स्क्रीनजवळ गेला तेव्हा तो नेमकं काय करतोय हे इतरांना समजत नव्हतं. मात्र नंतर तो स्क्रीन फाडत असल्याचं लक्षात आल्यावर इतरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचंही काही ऐकण्यास तयार नव्हता. अखेर त्याला रोखण्यात यश आलं. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेशने हा प्रकार घडला तेव्हा मद्यपान केलं होतं. चित्रपटामध्ये संभाजी महाराजांवर औरंगजेब करत असलेले अत्याचार सहन न झाल्याने जयेशने चित्रपटगृहातील स्क्रीनच फाडण्यास सुरुवात केली. आधी त्याने फायर एक्सटींगव्हीशरने स्क्रीनवर मारलं. त्यानंतर त्याने हातानेच स्क्रीन फाडण्यास सुरुवात केली. चित्रपटगृहातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
blue chip complex, Bharuch#Bharuch #Chhava #VickyKaushal #multiplex #screen #Damage #bluechipcomplex pic.twitter.com/nVMEnDo8Zz
— (@mgvimal_12) February 17, 2025
या चित्रपटगृहाच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, जयेशने केलेल्या या कृत्यामुळे एकूण दीड लाखांचा फटका बसला आहे. सोमवारचे सर्व शो रद्द करावे लागल्याने मोठा फटका बसल्याचं मॅनेजरने सांगितलं.