मुंबई : सचिन तेंडूलकरप्रती असणार्या प्रेमापोटी सचिन जाधव या चाहत्याने त्यांच्या सहकार्याच्या मदतीने तेंडल्या या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. “भारतीय क्रिकेट रसिकांचानायक सचिन तेंडुलकर यांच्यासाठी चाहत्यांनी निरनिराळ्या प्रकारांतून त्यांच्याबद्दलेचे आपले प्रेम व्यक्त केले आहे तसेचआम्ही आमच्या आयुष्यातील सचिनचे स्थान अधोरेखित करत सचिनच्या चाहत्यां विषयी ‘तेंडल्या’ मध्ये भाष्य केले आहे. असे चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी या प्रसंगी नमूद केले.
“आमच्या चित्रपटातील पात्रे अज्याबात काल्पनिक नाहीत,लगेच हुडकाया जाऊ नका, कारण ते कुठं घावणार बी नाय...अख्या ऑल इंडियात जिवंत आसू द्यात की मेलेलं आसू द्या...त्याच्यासंग योगा योगान नव्हं... तर ओढून ताणून आणलं तरी बी संबंध जुळणार नाय ” अशा विनोदी शैलीतील डिस्क्लेमर आणि आबालवृद्धांमध्ये खेळला जाणारा क्रिकेटआणि क्रिकेटवरील प्रेम अतिशय अफलातून पद्धतीने चित्र स्वरुपात दाखवला आहे. या सर्व गोष्टीतून ‘तेंडल्या’ या सिनेमाबद्दल चित्रपट रसिकांच्या मनात उत्कंठा निर्माणझाल्याशिवाय राहत नाही.
चित्रपटाची कथा, पटकथा,संवाद आणि दिग्दर्शन सचिन जाधव यांनी केले असून नचिकेत वाईकर हे सहदिग्दर्शक आहेत. अश्वमेध मोशन पिक्चर्स निर्मित ‘तेंडल्या’ चे छायांकन बाळकृष्ण शर्मा यांचे तर सहनिर्माते चैतन्य काळे आहेत. क्रिकेट, तेंडूलकरप्रेम, आणि ग्रामीण भागतील सामान्यांचे जीवन अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने रेखाटणारा ‘तेंडल्या’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण जेष्ठ क्रीडा पत्रकार आणि समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार,तंत्रज्ञ उपस्थित होते.