Tv Actor Yogesh Mahajan Died : मनोरंजन जगतातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. हिंदी टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध अभिनेते योगेश महाजन यांचं काल (19 जानेवारी) रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. योगेश महाजन यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि इंडस्ट्रीला देखील धक्का बसला आहे.
रिपोर्टनुसार, शनिवारी संध्याकाळी 'शिव शक्ति-तप त्याग तांडव' चे शूटिंग सुरु होते. शूटिंग संपताच योगेश यांची तब्येत बिघडू लागली. त्यामुळे त्यांनी लगेच डॉक्टरकडे जाऊन औषध घेतलं आणि आराम करण्यासाठी ते हॉटेलच्या खोलीत झोपले. मात्र, रविवारी सकाळी शूटिंगसाठी सेटवर योगेश महाजन हे आले नाहीत.
यानंतर मालिकेच्या टीममधील अनेकांनी त्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन उचलला नाही. त्यानंतर टीम त्यांच्या रुमकडे गेली. काही वेळाने त्यांनी त्या रुमचा दरवाजा तोडला तर ते मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. योगेश महाजन यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश महाजन हे जळगावचे रहिवासी
योगेश महाजन यांचा जन्म सप्टेंबर 1976 मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. योगेश यांनी आपल्या मेहनतीने मराठी, हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. मनोरंजन विश्वापूर्वी ते भारतीय लष्करात होते. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात भोजपुरीमधून केली होती. 'मुंबईचे शहाणे' अशा अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
योगेश महाजन यांच्यावर आज 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील प्रगती हायस्कूलजवळील गोरारी-2 स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.