मुंबई : टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत होती. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणारी अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन झालं आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत 'गुलाबो' ही व्यक्तिरेखा साकारणारी दिव्या हिला कोरोनाची लागण झाली होती. तिला गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिव्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात होते, तिची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
दिव्याचा मित्र युवराज रघुवंशी यांनी या अभिनेत्रीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्पॉटब्वॉयशी झालेल्या संभाषणात युवराजने सांगितले की, 'दिव्याचा मृत्यू सकाळी ३ वाजता झाला. दिव्याला हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री अडीच वाजता अचानक तिची प्रकृती खालावली. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यानंतर ३ वाजता डॉक्टरांनी सांगितले की, दिव्या आता या जगात नाही. ही बातमी माझ्यासाठी आणि दिव्याच्या कुटूंबासाठी मोठा धक्का आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो'.
'ये रिश्ता क्या कहलाता है' शिवाय दिव्या सेठजी, सिलसिला प्यार का, कभी हा कभी ना, कभी सौतन कभी सहेली, प्रीतो, श्रीमान श्रीमती फिर से, तेरा यार हूं मैं सारख्या मालिकांमध्ये दिसली होती.