मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधी भाजपवर टीका केली, त्यानंतर 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिला. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली हा मुद्दाही यामध्ये चर्चेत राहिला. नेमकं हे सारं प्रकरण काय होतं, यावर राज ठाकरेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
राज ठाकरेंची झालेली ईडी चौकशी आणि त्यानंतर राज ठाकरेंनी घेतलेली भाजपपूरक भूमिका यावरुन त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेला राज ठाकरेंनी आता जाहीर उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ईडी कारवाईबाबत सगळं काही सांगून टाकलं. 2005मध्ये व्यवसाय सुरु केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. कोहिनूर मिलची जमीन व्यावसायिक भागीदारांसह विकत घेतल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. कोहिनूर मिल जमिनीचे पैसे आयएलएफ कंपनीनं भरल्याचं राज ठाकरेंनी सांगितंलं. कोहिनूर पांढरा हत्ती ठरल्यानं हिस्सा विकून त्या व्यवसायातून बाहेर पडल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
कोहिनूर मिलप्रकरणी जो हिस्सा विकला त्या संदर्भात ईडीनं नोटीस बजावली. या प्रकरणी कर भरुनही ईडीची नोटीस का आली असा प्रश्न राज ठाकरेंना पडला होता. या प्रकरणात एका पार्टनरमुळं पुन्हा टॅक्स भरावा लागल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
ईडीची ही नोटीस अतिशय छोटी गोष्ट होती. एवढ्याशा गोष्टीवरुन आपण राजकीय भूमिका कशी बदलणार असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. ईडीच्या नोटीशीमुळं मोदींचं कौतुक करणाऱ्यांमधला राज ठाकरे नाही असं रोखठोक त्यांनी सांगून टाकलं. कारवाईची तलवार डोक्यावर घेऊन फिरत नसल्याचा टोला त्यांनी अजित पवारांचं नाव न घेता लगावला. मोदींनी आतमध्ये टाकू असा इशारा दिला आणि मंत्रिमंडळात टाकल्याचंही राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.
शिवछत्रपतींची शपथ घेऊन राज ठाकरेंनी ईडीची नोटीस आणि मोदीचं केलेलं कौतुक याचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे. आता तरी या विषयावर पडदा पडेल अशी राज ठाकरेंना अपेक्षा आहे