मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात कोरोनावरील उपचार घेत आहेत. वाढतं वय आणि त्यातच कोरोना, न्युमोनियाची लागण झाल्यामुळं लतादीदींची प्रकृती खालावली होती. ज्यानंतर तातडीनं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून आता एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.
देशात आणि साऱ्या जगात गानसम्राज्ञी अशी ओळख असणाऱ्या लतादीदींची प्रकृती आता सुधरु लागली आहे.
असं असलं तरीही त्या आयसीयुमध्येच असणार आहेत. अनुषा श्रीनिवासन अय्यर या दीदींच्या प्रवक्त्यांतडून मिळालेल्या माहितीनुसार त्या व्हेंटिेलेटरवर नसून अशा अफवाही पसरवू नये अशी विनंती मंगेशकर कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
सध्या दीदी योग्य पद्धतीनं अन्न ग्रहण करु लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सकारात्मत सुधारणा पाहायला मिळत आहेत.
डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांची टीम मिळून दीदींची काळजी घेत आहेत पुढील काही दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागातच उपचार सुरु राहतील.
वयाच्या 92 व्या वर्षी वाढतं वय आणि त्यामुळं उदभवणाऱ्या अडचणींमुळे सुधारणेची प्रक्रिया वेळ घेत असली तरीही दीदी या आजारपणातून सावरत आहेत.
हीच बातमी सध्या या गानसरस्वतीच्या तमाम चाहत्यांना मोठा दिलासा देऊन जात आहे.