Video Sonu Nigam Lashes Out Chief Minister: बॉलिवडूमधील प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम सध्या इन्स्टाग्रामवरील एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सोनू निगमने राजस्थानचे मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली आहे. 'रायझिंग राजस्थान' नावाने आयोजित सोहळ्याला सोनू निगमने हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्यात असं काही घडलं की त्याने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
सोनू निगमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भजन लाल शर्मा यांनी माता सरस्वती आणि कलेचा अपमान केल्याचा आरोप सोनू निगमने केला आहे. इतक्यावरच न थांबता सोनू निगमने राजकारण्यांना कलाकारांचा सन्मान करता येत नसेल तर त्यांनी संस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावू नये, असं परखड मत मांडलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनू निगमने, "भारतातील सर्व सन्माननिय राजकारण्यांना एक विनम्र विनंती आहे. तुम्हाला मध्येच एखाद्या कार्यक्रमामधून निघून जायचं असेल तर कलाकारांच्या कार्यक्रमांना तुम्ही हजेरी लावूच नका. हे असं करणं म्हणजे कलेचा, कलाकाराचा आणि माते सरस्वतीचा अपमान आहे," असं म्हटलं आहे.
'रायझिंग राजस्थान'च्या कार्यक्रमानंतर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सोनू निगमने, "कार्यक्रमांना अनेक राजकारणी उपस्थित होते ज्यामध्ये मुख्यमंत्री साहेब, क्रिडा मंत्री, युवा विकास मंत्री सर्वजणांचा समावेश होता. कार्यक्रम सुरु असताना मला दिसलं की मुख्यमंत्री आणि इतर काही लोक कार्यक्रम सुरु असताना अर्ध्यातच उठून निघून गेले. त्यांच्यानंतर इतर अधिकारीही निघून गेले. त्यामुळेच माझा राजकारण्यांना असा प्रश्न आहे की, तुम्ही कलाकारांचा सन्मान करणार नाही तर कोण करणार?" असा प्रश्न विचारला आहे.
राजकारण्यांनी मधून उठून निघून जायचं असेल तर कार्यक्रमांना येऊच नये असंही म्हटलं आहे. "जर तुम्हाला उठून जायचं असेल तर येऊच नका किंवा कार्यक्रम सुरु होण्याच्या आधीच निघून जा," असा सल्ला सोनू निगमने राजकारण्यांना दिला आहे. मध्येच उठून निघून जाणं हा कलाकाराचा अपमान असतो, असं सोनू निगमने म्हटलं आहे.
सोनू निगमने हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी सोनू निगमची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे. काहींनी कोणीतरी हिंमत करुन हे ऐकून दाखवण्याची हिंमत केली याबद्दल सोनू निगमचं अभिनंदन केलं आहे. तुम्हाला या विषयी काय वाटतं, कमेंट करुन नक्की कळवा.