Riteish Deshmukh Genelia D'souza: मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अगदी मोजकी सेलिब्रिटी कपल्स मनोरंजन विश्वात आहेत. यापैकीच आघाडीचं नाव म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझा! माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा या ओळखीवरुन हिंदी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेला अभिनेता अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया हे कायमच प्रकाशझोतात असतात. मग ते त्यांच्या मुलांच्या संस्कारांमुळे असो किंवा सोशल मीडियावरील रिल्समुळे असो रितेश आणि जेनेलियाची चाहत्यांमध्ये कायम चर्चा असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
खरं तर रितेश आणि जेनेलिया यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक रिल्स आणि टिकटॉक व्हिडीओ पोस्ट केले होते. तेव्हापासून हे दोघे मोठ्या पडद्यावरील केमिस्ट्रीबरोबरच या रिल्स आणि छोट्या व्हिडीओंसाठीही ओळखले जातात. या व्हिडीओंमध्ये अनेकदा ते मजेदार व्हॉइस ओव्हरवर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना हसवतात. या दोघांचे हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ नुकताच रितेशने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेशने जेनेलियाच्या एका सोप्या प्रश्नाचं असं काही उत्तर दिलं आहे की ते उत्तर दिल्यानंतर रितेशच्या चेहऱ्यावर 'आपण हे काय बोलून गेलो?' असे भाव दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये जेनेलिया अगदी हात पकडून रितेशला, "मला एक सांगा, लग्न म्हणजे काय ओ?" असा प्रश्न विचारते. त्यावर रितेश तिला लग्नाची व्याख्या अगदी सात शब्दात सांगतो. जेनिलायाला उत्तर देताना रितेश, "अगं, लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा," असं म्हणतो. मात्र त्यानंतर तोच डोळे मोठे करुन आपण हे काय बोलून गेलो असे हावभाव देताना दिसतोय. या रिलला 'काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला' हे गाणं बॅकग्राऊण्डला लावण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून दोघांच्या या कल्पकतेचं अनेकांनी कौतुक केलं आहे. अगदी पुण्याचा व्हायरल विनोदवीर अर्थव सुदामेनाही या रिलवर कमेंट केली आहे.
रितेश आणि जेनेलिया 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले. हे दोघे त्यानंतर रितेशने प्रमुख भूमिका साकारलेल्या काही मराठी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये एकत्र मोठ्या स्क्रीनवर झळकले आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत.