मुंबई : सुपरस्टार सलमान खान याच्या अनेक चित्रपटांना संगीत देणाऱ्या संगीतकार जोडी साजिद - वाजिद यांच्यातील वाजिद खान यांचं निधन झालं आहे. मुंबईत सोमवारी त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं आणि कलाविश्वाला हादरा बसला. चेंबूर येथील एका रुग्णालयात दाखल केलं असता किडनीमधील संसर्ग बळावल्यामुळं त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संगीत दिग्दर्शक सलीम मर्चंटनं ट्विटरच्या माध्यमातून वाजिद यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. 'त्यांना अनेक व्याधींनी ग्रासलं होतं. त्यांना किडनीचा आजार होता. नुकतं त्यांचं प्रत्यारोपणही झालं होतं. हल्लीच त्यांना किडनीचा संसर्ग झाल्याचंही कळलं होतं. प्रकृती खालावू लागल्यानंतर मागील चार तासांपासून त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरचा वापर करण्यात आला होता. किडनीच्या संसर्गानं सुरुवात झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली', असं सलीमने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितलं.
Devastated with the news of the passing away of my brother Wajid of Sajid -Wajid fame. May Allah give strength to the family
Safe travels bro @wajidkhan7 you’ve gone too soon. It’s a huge loss to our fraternity. I’m shocked & broken .
Inna Lillahi wa inna ilayhi raji'un
— salim merchant (@salim_merchant) May 31, 2020
वाजिद खान यांना किडनीच्या संसर्गासोबतच कोरोनाची लागण झाल्याचंही म्हटलं जात आहे. अशा चर्चा असल्या तरीही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वाजिद यांचं जाणं अनेकांना धक्का देणारं ठरत आहे. अगदी अनपेक्षितपणे त्यांची ही एक्झिट पाहता, यापुढं साजिद- वाजिद या जोडीची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही.
दरम्यान, साजिद- वाजिद आणि सलमान खानचे चित्रपट हे प्रेक्षकांसाठीचं अफलातून समीकरण यापुढे मात्र काहीसं अपूर्णच राहिल. या लोकप्रिय संगीतकार जोडीनं आतापर्यंत 'वॉण्टेड', 'दबंग', 'एक था टायगर' अशा चित्रपटांना संगीत दिलं होतं. संगीत दिग्दर्शनासोबतच त्यांनी रिऍलिटी शोमध्ये आपल्या भावासोबत परीक्षक म्हणूनही भूमिका बजावली होती. सारेगमप या रिऍलिटी शोमध्ये त्यांनी सर्वांची मनं जिंकली होती.