मुंबई : #MeToo या अतिव महत्त्वाच्या मोहिमेविषयी संपूर्ण कलाविश्वातून सध्या अनेकांनीच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दर दिवसाआड याप्रकरणी अनेकजण पुढे येऊन आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाविषयी भाष्य करत आहेत. तर कोणी पीडितांच्या पाठीशी उभं राहात आहेत.
अशा वेळी विश्वविख्यात संगीतकार, गायक ए.आर. रेहमान यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रेहमान यांनी आपलं मत मांडत अतिशय महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
गेल्या काही काळापासून #MeToo वर आम्हीही लक्ष ठेवून आहोत, असं म्हणत या साऱ्यामध्ये आरोपी आणि पीडित म्हणून समोर येणारे चेहरे, नावं पाहून एक धक्काच बसल्याचं रेहमान यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'कलाविश्वावर लागलेला हा डाग नाहीसा होऊन येत्या काळात महिलांसाठी येथे पूरक वातावरण निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा आहे. आपल्यावर झालेल्या अत्यातचाराविषयी खुलेपणाने बोलणाऱ्या पीडितांचा हा निर्णय स्तुत्य आहे. तेच खऱ्या अर्थाने सर्वशक्तीशाली आहेत', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
कलेचं प्रदर्शन करत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी येणाऱ्या महिलांना स्वत:कडून आणि आपल्या संपूर्ण टीमकडून पूरक आणि तितक्याच सुरक्षित वातावरणाची हमीही त्यांनी दिली.
— A.R.Rahman (@arrahman) October 22, 2018
सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी वाचा फोडण्यासाठी बऱ्याच बाबतीत मोकळीक मिळत आहे. पण, या साऱ्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याचीही काळजी घेतली जाणं तितकच महत्त्वाचं असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.