देशात एका दिवसात तब्बल 122 नवे ओमायक्रॉन रूग्ण सापडले!

देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय.

Updated: Dec 25, 2021, 08:42 AM IST
देशात एका दिवसात तब्बल 122 नवे ओमायक्रॉन रूग्ण सापडले! title=

मुंबई : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. देशभरात देखील दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. देशातील एकूण 17 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. यानुसार भारतात आता एकूण 358 ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळले आहेत.  

देशभरात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या 358 वर पोहोचली आहे. दरम्यान काल दिवसभरात देशात 122 नवे ओमायक्रॉनबाधीत आढळले. तर यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 114 ओमायक्रॉनबाधित रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे. 

देशभरात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे.
 
दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेत. या निर्बंधांप्रमाणे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असणार आहे. या काळात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. 

याशिवाय लग्नसमारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहे. क्षमतेच्या 50 % जास्त लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात मुबंईत ६८३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दीत वाढ झाली असून गर्दीमुळे कोरोनाचा आकडा वाढेल अशी भीती वर्तवण्यात आली आहे.