मुंबई : देशावरून कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. देशात 4 लाखांच्या आसपास कोरोनाचे अॅक्विव्ह रूग्ण असल्याची नोंद आहे. दरम्यान पूर्ण देशात अनलॉक करण्यात येतोय. मात्र कोरोनाचं संक्रमण थांबायचं नाव घेत नाही. दरम्यान तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. अशातच जर्मनीमध्ये करण्यात आलेला अभ्यास दिलासा देणारा आहे.
या अभ्यासामध्ये केलेल्या दाव्यानुसार, कॅश म्हणजेच पैशांच्या देवाण घेवाणीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका फार कमी असल्याचं म्हटलं आहे.
युरोपियन सेंट्रल बँकेच्या तज्ज्ञांनी रुहर-युनिव्हर्सिटी बोकमच्या मेडिकल मॉलिक्युलर व्हायरॉलॉजी विभागासह एकत्रितपणे संशोधन केलंय. यामागे कॅश म्हणजेच पैसे कोविड -19 संसर्गाच्या प्रसाराचं कारण असू शकतात का हे जाणून घेणं हा उद्देश होता.
हा विषाणू स्टेनलेस स्टीलच्या पृष्ठभागावर अर्थात नाणी आणि नोटांवर वेगवेगळ्या कालावधीसाठी जिवंत राहिला. संसर्गजन्य विषाणू सात दिवसानंतरही स्टीलच्या पृष्ठभागावर जिवंत सापडला. परंतु 10 युरोच्या नोटवर तीन दिवसांनी व्हायरस पूर्णपणे नाहीसा झाला.
10 सेंट नाण्यावर 6 दिवस, 1 युरो नाण्यावर दोन दिवस आणि 5 सेंटच्या नाण्यावर एका तासानंतर कोणताही विषाणू आढळला नाही. प्राध्यापक आयके स्टेनमन आणि डॉ. डॅनियल टॉड यांच्या म्हणण्याप्रमाणे, 5 सेंटचं नाणं तांब्याचं बनलेलं आहे. ज्यावर विषाणू अधिक काळ टिकत नाही.
प्राध्यापक आयके स्टेनमन आणि डॉ. डॅनियल टॉड यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी एक मॉडेल तयार केलं आहे. याद्वारे हे तपासण्यात आलं की, संसर्गजन्य विषाणूचे कण कॅशेच्या माध्यमातून त्वचेवर ट्रांसफर होतात का. IScience जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांनी युरो नाणी आणि नोटांवर व्हायरस किती काळ टिकतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. यासाठी, नाणी आणि नोट्स व्हायरस सोल्यूशन एकत्र ठेवलं आणि काही दिवस निरीक्षण केलं.
डॅनियल म्हणतात की, आम्ही पाहिलं पैशांच्या कोरड्या पृष्ठभागावरून कोणतेही प्रसारण होत नाही. वास्तविक जीवनातही असंच घडतं की, नाणी किंवा नोटा ओल्या होत नाहीत. या आधारावरून असं म्हणता येईल की रोख पैशातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका खूप कमी आहे.