मुंबई : डायबेटीजला सायलेंट किलर म्हणून संबोधलं जातं. सामान्यतः प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींमध्ये ही समस्या दिसून येत होती. मात्र आता चुकीच्या जीवनशैलीमुळे तरूणांमध्येही ही समस्या दिसून येते. जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते, तेव्हा शरीरात डायबेटीजची लक्षणं दिसून येतात. यापैकी काही लक्षणं ही पायांमध्येही दिसतात. अशावेळी तातडीने रक्ततपासणी केली पाहिजे.
डायबेटीजची पायांमध्ये दिसून येणारी लक्षणं पुढीलप्रमाणे-
जर तुमच्या पायांवर आपोआप जखम होत असतील किंवा एखादी छोटीशी जखम मोठ्या जखमेच्या रूप घेत असेल तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. ब्लड शुगरचं प्रमाण वाढलं की बॅक्टेरियांचं प्रमाण वाढतं. यामुळे पायांपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह होत नाही. यामुळेच इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
डायबेटीजमध्ये तुमच्या पायाला जळजळ होऊ शकते. ज्यामागे डायबेटीजमुळे होणारं यीस्ट इन्फेक्शन, कोरडी त्वचा या समस्या कारणीभूत असतात. यामुळे तळापायाला खासकरून जळजळ होते. त्यामुळे जर पायांना अशी जळजळ जाणवत असेल तर सतर्क रहा.
पाय सुजणं हे डायबेटीजचं सामान्य लक्षणं मानलं जातं. सतत तुमच्या पायाला सूज येत असेल तर ती डायबेटीजची समस्या असल्याची शक्यता आहे. कारण ब्लड शुगरची मात्रा वाढल्यानंतर शरीरातील विविध भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते.
जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा शरीराच्या नसांचं नुकसान होऊ लागतं. यामुळे नसा कमकुवत होऊन त्यांची संवेदना कमी होते. परिणामी पाय सुन्न होण्याची समस्या दिसून येते.