अमर काणे, झी 24 तास, नागपूर : आरोग्यवर्धक म्हणून अनेकजण हर्बल चहा घेतात. बरेच जण हर्बल चहाकडे वळण्याचा विचार करत असतील. तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हाच हर्बल चहा तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो.
हर्बल चहाविषयी सोशल मीडियात याच आशयाचा एक मेसेज व्हायरल होत आहे. झी 24 तासनं या मेसेजमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. हर्बल चहा आरोग्यासाठी खरंच चांगला आहे की नाही जाणून घेऊया.
चहा प्यायला कुणाला आवडत नाही, सकाळचा एक कप चहा दिवसाची सुरूवात तजेलदार करतो. नाश्ता असो वा दिवसातला ब्रेक टाईम किंवा मित्रांसोबतची मौजमजा, चाय तो बनती है.
अलिकडच्या काळात बरेच जण फिटनेसबाबत जागरूक असल्यानं हर्बल चहा पिण्याकडे कल वाढला आहे. मात्र याच हर्बल चहाविषयीच्या एका मेसेजनं चहाप्रेमींची झोप उडवली.
हर्बल चहामध्ये पॉलिसायक्लिक एरोमॅटिक हायड्रोजनचं प्रमाण अधिक असतं. हा घटक तंबाखू आणि सिगारेटमध्येही आढळून येतो. यामुळे फुफ्फुसं, यकृत तसंच पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. आपल्याकडे हर्बल चहा पिणा-यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे झी 24 तासनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा डॉक्टरांनी काय सांगितलं पाहा.
हर्बल चहामुळे कॅन्सर होतो यावर कोणतंही संशोधन पुढे आलेलं नाही. मात्र हा निश्चित संशोधनाचा विषय असू शकतो. शिवाय कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन कधीही वाईटच. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.