मुंबई : मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यातील अंबाह तहसीलच्या पुरा भागात एका धक्कदायक घटना घडली आहे. 16 वर्षांच्या मुलाला कथितपणे कोविड-19 लस दिली गेली आणि त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. या घटनेच्या एक दिवसानंतर रविवारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात, एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं की, अल्पवयीन बालकाला लसीकरण कसं केलं गेलं हे तपासातून स्पष्ट होईल. सूत्रांनी सांगितलं की, कमलेश कुशवाह यांचा मुलगा पिल्लू याला शनिवारी मोरेना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किमी अंतरावर लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यात आलं, त्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.
लसीकरणानंतर मुलाची तब्येत खालावली. अंबाह इथल्या डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी ग्वाल्हेरला पाठवलं. आजारी पडल्यानंतर त्याच्या कुटुंबाने लसीकरण केंद्रात गोंधळ घातला.
मोरेना जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. एडी शर्मा म्हणाले, 'अल्पवयीन मुलाला कोविड -19 लस कशी दिली गेली? याचा शोध घेण्याचं आदेश देण्यात आलं आहेत. अल्पवयीन मुलाचे आधार कार्ड तपासले जाईल. त्याच्या आधार कार्डनुसार तो 16 वर्षांचा आहे.