मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट आली असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. सध्याच्या घडीला देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 1431 इतकी पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 454 रुग्ण आढळून आल्याने चिंता अधिक वाढलीये. देशातील तब्बल 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 22,775 रुग्ण आढळले आहेत, तर 406 जणांचा मृत्यूंची नोंद करण्यात झाला आहे. सध्या देशात कोरोनाचा एक्टिव्ह रुग्णसंख्या 1,04,781 आहे. तर रिकव्हरी रेट 98.32% वर आहे.
सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेल्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिला असून राज्यात 8,067 प्रकरणं आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 3,451 प्रकरणं, केरळमध्ये 2,676 प्रकरणं, दिल्लीत 1,796 प्रकरणं आणि तामिळनाडूमध्ये 1,155 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाचा वेग पाहता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात दोन लाख एक्टिव्ह रुग्ण होण्याची शक्यता आहे. यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं की, ओमायक्रॉनची लक्षणं सौम्य आहेत. त्यामुळे तिसरी लाट घातक ठरणार नाही, असं समजू नका. ज्यांचं लसीकरण झालेलं नाही त्यांच्यासाठी हा व्हेरिएंट धोकादायक ठरू शकतो.