मुंबई : मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की आपली व मुलांची झोप उडते. परंतु, परीक्षेच्या तणावयुक्त काळात पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करण्यासाठी मूल रात्रभर जागतात आणि त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. मुलाला योग्य झोप मिळण्यासाठी आणि परीक्षेच्या दिवशी तो रिफ्रेश राहण्यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही काही मातांना प्रश्न विचारले आणि त्यांनी या टीप्स आमच्यासोबत शेअर केल्या.
परीक्षेच्या काळात फक्त झोपच नाही तर जेवणाकडे ही नीट लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मुलं जेवणापेक्षा इतर खाद्यपदार्थ जास्त खातात. त्यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. अशावेळी मुलांचे चित्त एकाग्र करणारे आणि शांत झोपेस मदत करणारे अन्नपदार्थ मुलांना द्या. मुलांना संत्री, किवी सारखी फळे देणे फायदेशीर ठरते. त्यामुळे मुलं उत्साही राहतात. तसंच पौष्टीक आहार दिल्याने त्यांना शांत झोप लागण्यास मदत होते.
पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलांवर ताण येतो. मुलं जर तणावमुक्त असेल तर ते अधिक चांगला अभ्यास करू शकेल. जेव्हा मुलाला अभ्यासात, ताण घालवण्यासाठी मदत हवी असेल तेव्हा अवश्य करा. मुलांना ओरडल्याने, रागवल्याने मुलं अस्वस्थ होते व त्यामुळे झोप ही नीट लागत नाही.
मुलांवरील ताण घालवण्यासाठी योग्य तेलाचा वापर करा. मुलांना शांत झोप लागण्यासाठी झोपण्याआधी डोक्याला योग्य तेलाने मसाज करा. त्यामुळे सकाळी उठल्यावरही त्यांना फ्रेश वाटते. आणि शांत मन तणावग्रस्त मनापेक्षा अधिक चांगलं काम करतं.
योग्य वेळी झोपून योग्य वेळी उठल्यास झोपेचे चक्र सांभाळले जाते. तसंच तुम्ही सहा महिन्यात किंवा वर्षभरात काय शिकलात याची परीक्षा असते. एका रात्रीत काय शिकलात याची नाही. त्यामुळे अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळा. त्याचा झोपेवर परिणाम होऊ देऊ नका.