Jowar Bajra Roti For Weight Loss: हल्लीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण आरोग्यदायी जीवनशैलीच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे. खाण्यापिण्याच्या सवयी म्हणू नका किंवा मग, योगसाधना (Yoga), ध्यानधारणा (Meditation) म्हणू नका. शक्य त्या सर्व परिंनी आपली प्रत्येक क्रिया शरीराला कशी लाभादयक ठरेल, यावर सर्वांचा भर असतो. Healthy Lifestyle ची सुरुवात होते ती म्हणजे आहाराच्या सवयींपासून. याच आहाराच्या सवयींमध्ये काही गोष्टींना प्राधान्य देत आणि काही सवयी दूर लोटत संकल्पना आजमावल्या जातात. खरंतर या संकल्पना नव्या नसून, त्या जुन्याच आहेत पण त्यांचं महत्त्वं आता पुढे आलं आहे इतकाच काय तो फरक.
आहारांच्या सवयींविषयी सांगावं तर, सध्या बरेचजण (Gluten free food) ग्लूटन फ्री आहाराला पसंती देतात. याची सुरुवात होतेय ती म्हणजे चपातीला आहारातून दूर लोटण्यापासून. गव्हाच्या पीठापासून बनवलेल्या चपातीमध्ये असणाऱ्या घटकांचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळं वजन वाढतं, काहींच्या बाबतीत आजारपणंही ओढावतं. पण, चिंता करू नका. कारण (Chapati) चपातीऐवजीही तुम्ही इतर गोष्टींपासून तयार करण्यात आलेल्या भाकऱ्या खाऊन भूकही भागवू शकता आणि वजनही नियंत्रणात ठेवू शकता.
काही प्रमाणात तांदुळ आणि सम प्रमाणात ज्वारी, बाजरी, नाचणी घेऊन तुम्ही या धान्यांचं एक पीठ तयार करू शकता. या पीठामध्ये तुम्ही सोयाबिनचे दाणेही दळताना मिसळू शकता. मिश्र धान्यांच्या पीठाची भाकरी पचनक्रिया सुरळीत करते, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार दूर ठेवते.
गेल्या काही वर्षांमध्ये ओट्स खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण, त्यात नाकं मुरडणारेही कमी नाहीत. त्यामुळं तुम्ही ओट्स बारीक दळून त्याच्या पिठापासून भाकरीही तयार करु शकता. यामुळं चयापचय क्रिया सुरळीत राहते.
गव्हाची चपाती खाता येत नसली तरीही त्याला पर्याय म्हणून तुम्ही गव्हाच्या कोंड्याची भाकरी खाऊ शकता. कोंडा बारीक दळून, चाळून त्याचं पीठ मळून ही भाकर केली जाते. यामुळं हाडांना बळकटी मिळते, सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
नाचणीमध्ये सोडियम आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अतिशय कमी असतं. त्यामुळं मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. नाचणीमध्ये असणाऱ्या तंतुमय घटकांमुळे शरीराला त्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांमध्ये नाचणीची भाकरी शरीराला मोठ्या फायद्याची ठरते.
विश्वास बसणार नाही, पण मेक्सिकोमध्ये मक्याच्याच पीठाला चपाचीसम पदार्थ बनवण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. मक्याच्या पिठात अतिशय कमी कॅलरी असतात. त्यामध्ये असणारी जीवनसत्त्वं आणि प्रथिनं शरीराला पूरक ठरतात. त्यामुळं चपातीऐवजी तुम्ही ही भाकरीही खाऊ शकता.