BJP MLA Sent Obscene Messages: देशभरामध्ये कोलकात्यामधील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरमध्येही 3 वर्षांच्या चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. देशभरातील या घटनांची चर्चा असतानाच दुसरीकडे हिमाचल प्रदेशमधील पोलिसांनी भारतीय जनता पार्टीचे राज्यातील आमदार हसन राज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेला अश्लील मेसेज पाठवणे, तिच्याकडे नग्न फोटोंची मागणी करणे, तिला धमकावणे यासारख्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चंबा जिल्ह्यातील चुराह येथून तीन वेळा आमदार राहिलेल्या हंस राज यांच्याविरुद्ध 20 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही तरुणी भाजपा कार्यकर्त्याची मुलगी असल्याचं सांगितलं जात आहे, असं 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तात म्हटलं आहे. हंस राज हे आमदार असण्याबरोबरच हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. चंबा येथील महिला पोलीस स्टेशनमध्ये 9 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीचा तपशील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरच यासंदर्भातील माहिती समोर आली.
सोशल मीडियावर या तक्रारीचा तपशील व्हायरल झाल्यानंतर संबंधित पीडित तरुणीने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आपणच तक्रार नोंदवल्याचं सांगितलं. "आपण मानसिक तणावामध्ये आहोत," असा दावा या तरुणीने केला आहे. कलम 164 सीआरपीसीअंतर्गत स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसमोर या तरुणीने आपला जबाब नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. "तरुणीने नोंदवलेल्या जबाबामध्ये या प्रकरणात आपल्याला पुढे तपास व्हावा असं वाटत नाहीये, असं म्हटलं आहे. मात्र आम्ही तपास करत आहोत," असं पोलिसांनी सांगितलं आहे.
नक्की वाचा >> 'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...'
हंस राज यांनी आपल्याला अश्लील मेसेज पाठवले. तसेच आपल्याला एकट्यात भेट अशी मागणी भाजपा आमदाराने केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. आपल्याकडे या आमदाराने नग्न फोटोंची मागणी केल्याचा धक्कादायक दावा तरुणीने केला आहे. या तरुणीने तिचे वडील बूथ स्तरावरील भाजपा कार्यकर्ते असल्याचं नमूद केलं आहे. आपल्याकडे दोन मोबाईल होते. त्यापैकी एक मोबाईल या आमदाराने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फोडल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी तरुणीने केली आहे. हा आमदार हे चॅट आणि मेसेज डिलीट करण्यासाठी आपल्यावर दबाव आणत असून आपल्या जीवाला धोका असल्याचं तरुणीने म्हटलं आहे.
या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यासाठी हंस राज उपलब्ध झाले नाहीत असं 'इंडियन एक्सप्रेस'ने म्हटलं आहे. त्यांचा फोन स्वीच ऑफ असून त्यांनी मेजेस तसेच व्हॉट्सअपवरुन प्रतिसाद दिला नाही.
नक्की वाचा >> Badlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं?
माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते जय राम ठाकूर यांनी हे गंभीर आरोप आहेत, असं म्हटलं आहे. "मी सर्व गोष्टी तपासून पाहणार आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये ही एफआयआर नोंदवण्यात आली हे महत्त्वाचं आहे. मला हंस राज यांचा फोन आला होता. त्यांनी त्यांची बाजू मला सांगितली. मात्र या प्रकरणामध्ये सर्व बाजू तपासून पाहणे गरजेचे आहे," असं जय राम ठाकूर यांनी म्हटलं आहे.