राजस्थानमध्ये वयस्कर जोडप्याने आपल्या घऱातील पाण्याच्या टाकीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घऱाच्या भिंतीवर सुसाईड नोट चिकटवली होती. यामध्ये त्यांनी मुलांकडून संपत्तीसाठी छळ होत असल्याने टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चिठ्ठीत लिहिण्यात आलं आहे की, मुलांनी आणि सुनांनी जवळपास पाच वेळा आपल्याला मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी जेवण देणं बंद केलं होतं. तसंच महिलेला वाडगं घेऊन भीक मागायला सांगितलं होतं.
70 वर्षीय हजारीराम बिश्नोई आणि त्यांची 68 वर्षीय पत्नी चावली देवी हे राजस्थानच्या नागौरमध्ये राहत होते. गुरुवारी करणी कॉलनीतील त्यांच्या घरातील पाण्याच्या टाकीत त्यांचे मृतदेह सापडले. या जोडप्याला दोन मुलं आणि दोन मुली आहेत. घराच्या भिंतीवर चिकटलेल्या दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, त्यांच्या एका मुलाने राजेंद्रने त्यांना तीनदा, तर दुसरा मुलगा सुनीलने दोनदा मारहाण केली.
मुलांनी आणि सुनांनी आपल्याला जर या सगळ्या प्रकाराची वाच्यता केली किंवा तक्रार दाखल केली तर झोपेत असतानाच मारुन टाकू अशी धमकी दिल्याचंही सुसाईड नोटमध्ये सांगितलं आहे. चिठ्ठीत राजेंद्र आणि त्याची पत्नी रोशनी, सुनील आणि त्याची पत्नी अनिता, मुलगा प्रणव, तसंच मुली मंजू, सुनिता आणि काही नातेवाईकांची नावं लिहिली आहेत. या जोडप्याने आरोप केला आहे की, त्यांच्या मुलांना त्यांच्या नावावर असलेली सर्व मालमत्ता हवी आहे आणि नातेवाईकांनी त्यांना कोणत्याही आवश्यक मार्गाने ते साध्य करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे.
या चिठ्ठीत म्हटलं आहे की, मुलांनी फसवणूक करून आणि भांडण करून तीन प्लॉट आणि एक कार हस्तांतरित करत आधीच मालकी मिळवली होती. त्यात राजेंद्र, मंजू आणि सुनीता यांच्या नावे हस्तांतरित केलेल्या कारच्या विक्रीची माहिती देण्यात आली आहे तसंच सुनील आणि त्यांची पत्नी अनिता यांनी करणी कॉलनीतील घराच्या व्यवहाराचीही माहिती दिली आहे.
हे सर्व त्यांच्याकडून घेतल्यानंतर मुलांनी आई-वडिलांनाजेवण देण्यास नकार दिला आणि दररोज फोनवर शिवीगाळ केली. चिठ्ठीत म्हटलं आहे की, त्यांचा मुलगा सुनीलने त्यांना बोलावून सांगितले, "एक वाडगं घ्या, आणि अन्नाची भीक मागा. मी तुम्हाला अन्न देणार नाही. तुम्ही कोणाला सांगितले तर मी तुम्हाला मारून टाकेन".
नागौरचे पोलीस अधीक्षक नारायण तोगस यांनी सांगितलं की, त्यांना गुरुवारी हजारीराम आणि चावली देवा य़ांच्या घरात कोणतीही हालचाल दिसत नसल्याची माहिती मिळाली. त्यांनी कंपाऊंडमध्ये शोध घेतला टाकीत मृतदेह आढळले. "हजारीरामच्या खिशात घराची चावी सापडली असून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. आम्ही घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सुसाईड नोट मिळाली आहे," असं नारायण तोगस यांनी सांगितलं.