Viral Video: गोव्यातील (Goa) एका व्यक्तीला पाकिस्तान क्रिकेट संघाला (Pakistan Cricket Team) पाठिंबा दिल्याने जाही माफी मागण्यास लावण्यात आलं. पाकिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा देत, घोषणा देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर लोकांनी त्याला भररस्त्यात माफी मागण्यास भाग पाडलं. गोव्यातील कलंगुट (Calangute) येथे ही घटना घडली आहे. ही व्यक्ती किरकोळ विक्रेता आहे. लोकांनी त्याला फक्त माफी मागायला लावली नाही, तर 'भारत माता की जय' (Bharat Mata Ki Jai) अशा घोषणाही द्यायला लावल्या. त्याचा माफी मागतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
एका ट्रॅव्हल व्लॉगरने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओत उत्तर गोव्याच्या कलंगुट येथील एक दुकानदार पाकिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा देत असल्याचं दिसत होतं. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील सामन्यादरम्यान हा व्हिडीओ शूट करण्यात आला होत असं त्यातून दिसत आहे.
व्हिडीओत ट्रॅव्हल व्लॉगर दुकानदाराशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी तो दुकानदाराला कोणामध्ये सामना सुरु आहे? अशी विचारणा करतो. त्यावर दुकानदार पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघ खेळत असल्याचं सांगतो. दरम्यान यानंतर व्लॉगर त्याला तुम्ही कोणाला पाठिंबा देत आहात? असं विचारतो. त्यावर तो पाकिस्तान असं उत्तर देतो. यावर व्लॉगरने कारण विचारलं असता, दुकानदार हा मुस्लीम परिसर असल्याचं उत्तर देतो.
दुकानदाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर गुरुवारी काही लोक त्याच्या दुकानात शिरले आणि पाकिस्तानला पाठिंबा देण्याबाबत विचारणा केली. दुकानदाराला जाब विचारला जात असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत जमाव दुकानदाराला जाब विचारताना कलंगूट संपूर्ण गावाचं असून कोणत्याही एका धर्माचं नाही असं सांगताना दिसत आहेत.
The man who was supporting Pakistan in Goa pic.twitter.com/jE8IidAf9K
— Madhur Singh (@ThePlacardGuy) February 24, 2023
यानंतर जमाव दुकानदाराला माफी मागण्यास सांगतो. व्हिडीओत दुकानदार खाली गुडघ्यावर बसून, कान धरुन माफी मागत असल्याचं दिसत आहे. यानंतर त्याला 'भारत माता की जय' अशा घोषणाही देण्यास सांगितलं जातं. यावेळी जमावासह दुकानदारही घोषणा देत असल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे. दरम्यान याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.