माणिकराव कोकाटे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमधून बाहेर? दादा भुसे, गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच!

सदनिका घोटाळ्यातील शिक्षेनंतर माणिकराव कोकाटे रेसमधून आऊट होणार? नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे, गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच!

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 21, 2025, 08:24 PM IST
माणिकराव कोकाटे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमधून बाहेर? दादा भुसे, गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच!

नाशिक जिल्हा पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं नाव पालकमंत्रिपदासाठी चर्चेत होतं. तसंच दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्येही पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच असल्याची चर्चा आहे. दरम्यान सदनिका घोटाळा प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचं नाव मागे पडलंय. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता आहे. 

सदनिका घोटाळा प्रकरणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमधून जवळजवळ आऊट झाले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्याकडे नंदुरबारचं पालकमंत्रिपद असलं तरी नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी ते इच्छूक होते. 

या प्रकरणामुळे कोकाटेंना फटका

1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे. दरम्यान या प्रकरणी कोर्टानं आज निकाल दिला आणि माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीय. फसवणूक केल्याप्रकरणी मिळविलेल्या चारही फ्लॅटचा ताबा घेण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्यानंतर पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

नाशिक, रायगडचा पालकमंत्री कोण होणार?

पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. पालकमंत्रिपदाचं वाटप केल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांची निवड करण्यात आली होती. तर रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरेंची नियुक्ती
करण्यात आली होती. मात्र, नाशिकचं पालकमंत्री महाजनांकडे गेल्यानं शिवसेनेत दादा भुसे, तर राष्ट्रवादीत कोकाटे नाराज होते. तर रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना दिल्यानं शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी देखील नाराज झाले होते. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. स्थगिती दिल्यानंतर जवळपास 1 महिन्यांचा कालावधी उलटला तरीही नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. 

पालकमंत्रिपदाचा तिढा अमित शाहांच्या दरबारी?

रायगड  आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा हा अमित शाहांच्या दरबारी सुटणार अशी सूत्रांची माहिती आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून अमित शाह पालकमंत्रिपदावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

मागील अनेक दिवसांपासून स्थगिती आणलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावर कधी निर्णय होणार? कोकाटेंचा पत्ता जवळजवळ आऊट झाल्यानंतर आता केवळ गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात रस्सीखेंच असल्याची चर्चा आहे.