मुंबईवर घोंघावतोय मोठा धोका; काय आहे सिटी किलर? ज्यावर NASA चीही नजर!

Mumbai Asteroid: हा लघुग्रह आदळला तर संपूर्ण मुंबई शहर उद्ध्वस्त होऊ शकते, असे नासाचे म्हणणे आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 21, 2025, 07:09 PM IST
मुंबईवर घोंघावतोय मोठा धोका; काय आहे सिटी किलर? ज्यावर NASA चीही नजर!
सिटी किलर

Mumbai Asteroid: नासाने मुंबई आणि मुंबईकरांसाठी एक धडकी भरवणारी बातमी दिली आहे. नासाच्या मते, मुंबईतील सुमारे 2 कोटी लोकांचे जीवन धोक्यात आहे. या धोक्याला सिटी किलर असेही म्हटले जात आहे. मुंबईवर एक लघुग्रह पडण्याचा धोका असल्याचा सतर्कतेचा इशारा नासाने वर्तवला आहे. हा लघुग्रह आदळला तर संपूर्ण मुंबई शहर उद्ध्वस्त होऊ शकते, असे नासाचे म्हणणे आहे. या लघुग्रहाचे नाव YR4 आहे. ज्याला सिटी किलर असेही म्हटले जाते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सापडलेल्या लघुग्रह YR4 बद्दल खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष आहे.

नासा देखील लक्ष ठेवून 

'सिटी किलर' नावाचा हा लघुग्रह 22 डिसेंबर 2032 रोजी आपल्या ग्रहाजवळून जाण्याची शक्यता आहे. या काळात ते आपल्या ग्रहाशी टक्कर देऊ शकते. ज्याची शक्यता आता 1.5 टक्के आहे.
आपल्या ग्रहावर लघुग्रह आदळण्याची शक्यता एक टक्क्यांहून अधिक असल्याने नासासह जगभरातील अंतराळ संस्था त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मुंबईसह या शहरांनाही इशारा 

खगोलशास्त्रज्ञांनी नासाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन YR4 बद्दल पोस्ट केली आहे. लघुग्रहाच्या पडझडीमुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या क्षेत्रांबद्दल यात माहिती देण्यात आली आहे. सायंटिफिक अमेरिकनने यासंदर्भात वृत्त दिले आहे. नासाच्या मूल्यांकनानुसार पूर्व पॅसिफिक महासागरापासून दक्षिण आशियापर्यंतच्या क्षेत्रांचा यामुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्राचा समावेश असेल.बोगोटा, कोलंबिया, लागोस, नायजेरिया आणि मुंबई सारखे जास्त लोकसंख्या असलेले क्षेत्र यात आहे. 

किती मोठा लघुग्रह?

हा लघुग्रह 130 ते 300 फूट रुंद असल्याचे मानले जाते. जर एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर तो एक अतिशय प्राणघातक स्फोट ठरु शकतो. हा लघुग्रह पृथ्वीच्या आकाशात फुटतो किंवा पृथ्वीवर एक खड्डा निर्माण करतो, अशी माहितीदेखील देण्यात आली आहे. 

कोणत्या शहरांना धोका आहे?

लघुग्रह आदळल्यास प्रभावित होऊ शकणारे क्षेत्र देखील नासाने ओळखले आहेत आणि त्यांना यासंदर्भात इशाराही दिला आहे. नासाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पूर्व पॅसिफिक, उत्तर दक्षिण अमेरिका, अटलांटिक, आफ्रिकेचा काही भाग, अरबी समुद्र आणि दक्षिण आशिया यांचा समावेश आहे. मुंबई, कोलकाता, ढाका, बोगोटा आणि लागोस ही शहरेदेखील जोखीम क्षेत्रात येतात. असे असले तरी लघुग्रह कोणतेही नुकसान न करता निघून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे एडिनबर्ग विद्यापीठातील ग्रह विज्ञानाचे प्राध्यापक कॉलिन स्नोडग्रास सांगतात. 

सर्वांना डार्ट मिशनकडून आशा

आंतरराष्ट्रीय लघुग्रह वॉर्नंग नेटवर्कने या लघुग्रहाचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्याच्या कक्षेतील अनिश्चितता कमी करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंतराळ मोहिमेच्या नियोजन सल्लागार गटालाही सतर्क करण्यात आले आहे. हा गट लघुग्रह वळवण्याची योजना आखत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत हा खडक गायब होण्यापूर्वी त्याचे अधिक तपशीलवार निरीक्षण करण्याचे खगोलशास्त्रज्ञांचे उद्दिष्ट आहे. नियोजन सल्लागार गटाने केलेल्या अभ्यासानंतर त्यांनी 2032 मध्ये लघुग्रह पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता नाकारली नाही. 2028 मध्ये पुन्हा दिसेपर्यंत हा लघुग्रह अवकाश संस्थांच्या जोखीम यादीत राहील. लघुग्रहाचा आकार पाहता आवश्यक असल्यास DART सारखी मोहीम प्रभावी ठरू शकते, असे खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.