MLA Vikram Kale Photo Session: राज्यभरात सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थी अभ्यास करुन परीक्षा देण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे शिक्षक आमदार महोदय मुलांसोबत फोटोसेशन करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून बारावी परीक्षा केंद्रात जाऊन फोटोसेशन करताना दिसत आहेत. विक्रम काळे यांनी स्वत:च आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपले फोटो शेअर केले आहेत. पण यानंतर त्यांच्या फोटोसेशनवर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बारावीचे विद्यार्थी पेपर लिहीत असताना आमदार विक्रम काळे यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली आणि पाहणी करतानाचे फोटो काढले. अशा अवेळी फोटोसेशनमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत नसेल का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
विक्रम काळे यांनी धाराशिवमधील येडसी, सोलापूरमधील बार्शी, बीडमधील धारूर, पाथरी आणि परभणी जिल्ह्यातील केंद्राला भेटी दिल्या. तसेच फोटोही काढले. इयत्ता बारावीच्या (HSC) बोर्ड परीक्षेच्या केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधांची पाहणी केली. परीक्षा सुरळीतपणे व कॉपीमुक्त वातावरणात सुरू असल्या बाबत समाधान व्यक्त केल्याचे विक्रम काळे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले. विशेष करून सोलापूर जिल्ह्यात जो ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्राचे निग्राणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत प्रत्येक केंद्राची केली जात असल्याची पाहून समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
विक्रम काळे यांनी बारावीच्या परीक्षा केंद्रावर पाहणी करतानाचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. एकीकडे राज्य सरकार कॉपीमुक्त अभियान राबविण्यात व्यस्त असताना सरकारी आमदारांनी हे फोटोसेशन केल्याची टीका होत आहे. कॉपीमुक्त अभियान राबवत असताना परीक्षा केंद्रावर मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक गॅजेटला बंदी असते. अशावेळी हा नियम विक्रम काळे यांना लागू होत नाही का? असा प्रश्न विचारला जातोय. शिक्षक आमदार विक्रम काळे हे परीक्षा बोर्डाचे सदस्य असल्याने ते पाहणी करू शकतात. पण फोटोचे माहीत नाही असे स्पष्टीकरण परीक्षा महमंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.