PF Withdrawal Through UPI: देशातील कोट्यवधी पीएफ ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या हक्काचा पीएफ एटीएमद्वारे काढता येणार असल्याचे वृत्त काही दिवसांपुर्वी समोर आले होते. यावर वेगाने कार्यवाही सुरु असून आता पीएफ धारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण पेन्शन धारकांना आता त्यांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाही. ते मोबाईलमध्ये असलेल्या पीएफद्वारेदेखील आपले पीएफचे पैसे काढू शकतात. सध्या पीएफ काढण्याची प्रक्रिया खूपच किचकट आहे. त्यामुळे पीएफ काढताना पेन्शनधारकांना लांबलचक प्रक्रिया करावी लागते आणि अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. ईपीएफ ग्राहकांचे दावे निकाली काढण्यास मदत करणारी प्रणाली तयार करण्यावर केंद्र सरकारकडून वेगाने काम सुरु आहे.
पेन्शन काढण्याची प्रक्रिया यूपीआय प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण केली जाऊ शकते. याच्या मदतीने तुमच्या पेन्शनची रक्कम अगदी सहजपणे हस्तांतरित करता येऊ शकते. फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यूपीआयद्वारे पेन्शनसंदर्भात ईपीएफओने एक ब्लूप्रिंट तयार केली आहे. पुढील 2 ते 3 महिन्यांत यूपीआय प्लॅटफॉर्मवर पीएफ प्रक्रिया सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी चर्चा सुरू असल्याची माहिती यात देण्यात आली आहे.
ईपीएफओने देशभरातील आपल्या कोट्यवधी ग्राहकांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलले आहे. ईपीएफ यूपीआयशी इंटरलिंक झाल्यावर ग्राहक त्यांच्या पीएफ खात्यातून डिजिटल वॉलेटद्वारे पैसे काढू शकणार आहेत. कामगार मंत्रालय व्यावसायिक बँका आणि आरबीआय यांच्या सहकार्याने ईपीएफओच्या डिजिटल प्रणालींमध्ये परिवर्तन करण्यासाठी काम सुरु आहे. पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी करणे हे यामागचे उद्दीष्ट आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या सदस्यांसाठी ही सुविधा खूप सोयीची ठरेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ईपीएफओ गुंतवणुकीच्या पद्धतीतही बदल केला जाऊ शकतो. ज्यामध्ये कर्ज साधनांमधील गुंतवणूक 20% वरून 10% पर्यंत कमी करण्याची योजना आहे. यासाठी कामगार मंत्रालय आता अर्थ मंत्रालयाची मंजुरी घेणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील रोख्यांचा कमी परतावा आणि पुरवठा हे यामागचे कारण आहे. या बदलानंतर परतावा देणाऱ्या ईपीएफओ कॉर्पोरेट बाँडमध्ये अधिक गुंतवणूक करू शकणार आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. जर हा बदल लागू झाला ७ कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या निवृत्ती बचतीवर याचा परिणाम दिसेल.