चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली आहे. भारताने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयात गोलंदाज मोहम्मद शमीने मोलाचा वाटा उचलला. मोहम्मद शमीने 53 धावा देत 5 गडी बाद केले. करिअर संपुष्टात आणणाऱ्या दुखापतीमधून सावरत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीचं मनोबल वाढवण्यासाठी ही कामगिरी गरजेची होती. आपण नियमितपणे विकेट घेण्याच्या उद्देशाने चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहोत असं मोहम्मद शमीने म्हटलं आहे.
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने मोहम्मद शमीला चॅम्पिअन्स ट्रॉफीत संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहला पाठीची दुखापत झाल्याने विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे 2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकप अंतिम सामन्यानंतर घोटा, टाच आणि गुडघ्याच्या दुखापतींमुळे त्याला बरे होण्यास विलंब लागला. त्यानंतर आता अखेर मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केलं आहे.
वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमी 24 विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला होता. त्याने सात सामन्यात एकूण 24 विकेट्स घेतले होते. पण इतक्या चांगल्या कामगिरीनंतरही अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला आणि तोंडचा घास ऑस्ट्रेलियाने हिसकावून घेतला.
"वर्ल्ड कपमध्ये दुखापत होणं, तुमचा फॉर्म खालावणं कठीण होतं," असं शमीने पत्रकारांना सांगितलं. "ते 14 महिने खूप कठीण होते, कारण मला सर्व गोष्टी पुन्हा कराव्या लागल्या आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो आणि तुम्हालाही वेदना होतात. मी स्थानिक सामन्यांमध्ये आणि (इंग्लंडविरुद्ध) चार आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलो आणि आपला आत्मविश्वास परत मिळवला," असं शमी म्हणाला.
आयसीसी स्पर्धांमधील आपल्या कामगिरीवर शमी म्हणाला की, "खासकरुन आयसीसी स्पर्धांमध्ये मी नेहमी प्रयत्न करतो. जरी मी खूप धावा केल्या तरी किमान विकेट्स मिळावेत यासाठी प्रयत्न असतो".
मोहम्मद शमी नेहमी मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असतो. तसंच त्याने आयसीसी स्पर्धेत जलदगतीने विकेट घेण्याचा झहीर खानचा रेकॉर्ड मोडला आहे. झहीर खानने 59 विकेट्स घेतले होते. शमीने 60 विकेट्स घेतल्या आहेत.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 ने पराभव केला. यावेळी बुमराहला दुसऱ्या गोलंदाजाची साथ न मिळाल्याने मोहम्मद शमीची कमतरता जाणवत होती. यावर शमीने आपल्यालाही ते पाहणं फार कठीण जात होतं असं म्हटलं आहे. "तुम्ही नेहमीच तुमच्या बॉलिंग युनिटची आठवण काढत असता, खासकरुन ज्यांच्यासोबत असता," असं शमी म्हणाला.
"तुम्हाला नेहमीच वाटतं की मीदेखील योगदान देऊ शकलो असतं तर बरं झालं असतं. तुम्हाला नेहमीच याची आठवण येते की जेव्हा तुम्ही दुखापतग्रस्त असता तेव्हा तुम्ही खेळ पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही," अशी खंत त्याने बोलून दाखवली.
दुबईमध्ये 2021 च्या टी-20 विश्वचषकात भारत पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं होतं. शमीवर मुस्लिम असल्याबद्दल हल्ला करण्यात आला होता आणि तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि अनेक माजी खेळाडूंनी त्याची बाजू घेतली होती.
त्याबद्दल विचारण्यात आलं असता शमी म्हणाला की, "सोशल मीडिया आजकाल इतका वाढला आहे की त्यामुळे तुमच्या मनात काही नको असलेल्या गोष्टी येऊ शकतात".
"मला अशा गोष्टींबद्दल विचार करायला आवडत नाही. लोक तुम्हाला वाईट कामगिरीची आठवण करून देतील आणि त्याने तुम्हालाही त्रास देईल. पण मला वाटतं की एक क्रिकेटपटू आणि खेळाडू म्हणून तुम्ही जास्त मागे वळून पाहू नये आणि फक्त वर्तमानात राहून भविष्यासाठी योजना आखू नये," असं मत त्याने मांडलं आहे.