SSC Paper Leaked: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली आहे. ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.यंदा परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये 8 लाख 64 हजार 120 मुले, 7 लाख 47 हजार 471 मुली, तर 16 ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी एकूण 29 हजार 492 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तर 5 हजार 130 मुख्य केंद्रांवर परीक्षा होत आहे. दरम्यान परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय.
दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला आहे. जालनातील बदनापूर शहरात हा प्रकार समोर आला. येथे चक्क 20 रुपयात दहावीच्या प्रश्नपत्रिका मिळत आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज पहिला मराठी विषयाचा पेपर होता. राज्यभरातील विविध केंद्रांमध्ये परीक्षा सुरु झाली. पण बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर वेगळाच प्रकार सुरु होता. पेपर फुटल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांतच प्रश्नपत्रिता बाहेर आली. यानंतर शहरातील झेरॉक्स सेंटरवर प्रश्नपत्रिकेच्या कॉपी मिळू लागल्या. अवघ्या 20 रुपयांना या कॉपी विकल्या जात होत्या. त्यामुळे बोर्डाकडून ही प्रश्नपत्रिका रद्द करुन पुन्हा परीक्षा घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जालन्यासोबतच येवल्यातही कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येवल्यातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय.. अनेक केंद्रांवर बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांनी गर्दी केली होती.कॉपी पुरवण्यासाठी विरोध करणा-या शिक्षकांना देखील टवाळखोर दमदाटी करत असल्याचे काही शिक्षकांनी सांगितलं. दरम्यान यावेळी झी 24 तासचा कॅमेरा बघताच टवळखोरांची एकच पळापळ झाली.
दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही. स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान दोषी व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचे यात सांगण्यात आले. आज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसुन, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.