Mumbai Congress : राज्यात काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल झाल्यानंतर मुंबई काँग्रेसचा चेहरा बदलणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई काँग्रेस संघटनेत मतभेद व बदलीचा एक मोठा इतिहास आहे. अनेकदा प्रयत्न करूनही हा इतिहास आजपर्यंत काँग्रेस पक्षनेतृत्वाला बदलता आलेला नाही. त्यामुळे एकजुटीने पालिका निवडणुकांना सामोरे जाणे, हे काँग्रेस पक्षासाठी एक मोठी कसोटी असणार आहे.
महाराष्ट्र काँग्रेसला हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपात नवे नेतृत्व मिळाले. दुसरीकडे स्वतंत्र अस्तित्व असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे हे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरु आहे. मुंबई काँग्रेस संघटनेत सध्या वर्षा गायकवाड विरुद्ध इतर सर्व काँग्रेस नेते असे शीतयुद्ध गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. लोकसभेत पक्षाने चांगले यश मिळवले. मात्र वर्षा गायकवाड यांच्या रूपात काँग्रेसचा एक खासदार निवडून आला.
लोकसभेनंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत केवळ तीन जागा जिंकता आल्या. पक्षाची आतापर्यंतची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांत समन्वयाचा अभाव ठळकपणे जाणवला. मुंबईतून काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड हे तीन आमदार निवडून आले. दुसरीकडे काँग्रेसचा प्रभाव असलेले मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे काँग्रेसच्या हमखास निवडून येणाऱ्या जागा कमी झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे नेते करत आहेत. मुंबई काँग्रेसची वाताहत झाल्यामुळे वर्षा गायकवाड यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी काँग्रेसची एक टीम नव्याने कामाला लागली आहे, मात्र या मोहिमेला यश मिळाले नाही.
पक्षसंघटनेत मरगळ
विधानसभेतील दारूण पराभवानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षसंघटनेत मरगळ आली आहे. पालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र त्याची कुठलीही तयारी सुरू झालेली दिसत नाही. विधानसभेतील पराभवानंतर शिवसेनेचा ठाकरे गट पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसची गोची झाली आहे. त्यातच मिलिंद देवरा, संजय निरुपम हे दोन माजी मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी पक्ष सोडला. हे नेते आता शिंदे सेनेसोबत आहेत. या सर्व फाटाफुटीमुळे पक्ष संघटनेत मरगळ आली आहे.
उमेदवार मिळणे कठीण
जर आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढवायच्या असतील, तर काँग्रेसला पालिकेच्या 227 जागांवर उमेदवार मिळणेही कठीण होईल, असे चित्र आहे. मुंबईतील अनेक वॉर्ड, जिल्हा अध्यक्षपदे रिक्त आहेत. आमदार भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्या वेळी त्यांनी पालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे अर्ज मागवून घेतले होते, मात्र त्यातील अनेक इच्छुक पक्ष सोडून गेले आहेत. पालिका निवडणुका लागल्यावर अनेक नेते पक्ष सोडून जातील, अशी भीती संघटनेला सतावत आहे.
मुंबई काँग्रेसपुढील आव्हान
पक्षांतर्गत मतभेद संपवणे.
विधानसभा पराभवानंतर संघटनेतील मरगळ झटकणे.
पक्षातील पदाधिकाऱ्यांची गळती तत्काळ थांबवणे.
पालिकेची तयारी करणे आणि संघटनेत ऊर्जा फुंकणे.
मुंबईत काँग्रेस नेतृत्वबदल का नाही?
दलित नेतृत्वाला प्राधान्य देण्याची पक्षाची भूमिका.
संविधान हा पक्षाचा कोअर मुद्दा. गायकवाड यांचे पक्षनेतृत्वाशी चांगले संबंध.
मुंबईत दुसरा सक्षम चेहरा नाही.