'परराज्यातून येणाऱ्या रुग्णांमुळे खूप ताण', राज ठाकरेंना BMC आयुक्तांना स्पष्ट सांगितलं, 'ते लोकं काही...'

Raj Thackeray on BMC Hospitals: परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा फार ताण पालिकेच्या रुग्णालयांवर येतो आणि परिस्थिती बिघडते असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मनपा आयुक्तांची भेट त्यांनी हा मुद्दा मांडला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2025, 03:51 PM IST
'परराज्यातून येणाऱ्या रुग्णांमुळे खूप ताण', राज ठाकरेंना BMC आयुक्तांना स्पष्ट सांगितलं, 'ते लोकं काही...'

Raj Thackeray on BMC Hospitals: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी आज पालिका आयुक्त भुषण गगराणी  (Bhushan Gagrani) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा मुद्दा मांडला आहे. परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा फार ताण पालिकेच्या रुग्णालयांवर येतो आणि परिस्थिती बिघडते असं त्यांनी मनपा आयुक्तांना सांगितलं आहे. त्यांच्यावर वेगळे काही चार्जेस लावण्यात येतील का यासंदर्भात बोलणं झालं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

"महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबई, महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांचा प्रश्न नाही. पण परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा फार ताण पालिकेच्या रुग्णालयांवर येतो आणि परिस्थिती बिघडते. या सगळ्या गोष्टींचं ओझं पालिकेलाचा वाहावं लागत आहे. इतर राज्यांमधून येणारे रुग्ण हवेत की नकोत हा प्रश्न नाही. पण इतर राज्यातून येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या तेथील पालिका, लोकं ही काही मुंबई पालिकेला पैसे देऊ करत आहे का? की मुंबई पालिकेने फक्त रुग्ण पाहायचे आणि आपल्या शहर, रुग्णालयावरचा ताण वाढवायचा? वेगळे काही चार्जेस लावण्यात येतील का यासंदर्भात बोलणं झालं आहे," अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे. 

'रिलायन्स, अदानी यांच्याकडून पैसे घ्या'

"मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्स, अदानी किंवा इतरांच्या असतील. आज मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती काही फारशी चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून येणारे पैसे महापालिका का घेत नाही? हा प्रश्न आहे. हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण आता आयुक्तांकडून राज्य सरकारला त्या प्रकारचं पत्र जाईल आणि महापालिकेला मिळणारे पैसे इतरत्र हलवू नयेत अशी आमची इच्छा आहे. कारण जीसएटीनंतर ऑक्ट्रॉय बंद झाला आहे. तो बंद झाल्याने पालिकेवर खूप ताण आहे," असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

सर्वांना कर लावणार, मग या कंपन्याना का नाही? या काही धर्मादाय संस्था नाहीत. त्या त्यांचा नफा कमावत आहेत. मग महापालिकेने यांच्याकडून पैसे का घेऊ नयेत? हा राज्य सरकारचा निर्णय असल्याने मी त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेईन असंही राज ठाकरेंनी सांगितलं. 

'मूर्तीकारांनी विचार केला पाहिजे'

दरम्यान गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की, "याचा आता मूर्तीकारांनी विचार केला पाहिजे. दरवेळी हीच गोष्ट येणार असेल तर गोष्टी बदलल्या पाहिजे. तुम्हाला सरकारचं काय म्हणणं आहे माहिती असताना तुम्ही यात बदल करायला हवा ना. तोच प्रश्न दरवर्षी कसा येतो? दरवर्षी भूमिका घ्यायची. त्यामुळे होणारं प्रदूषण मोठं आहे याचा मूर्तीकारांनाही विचार करायला हा. दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे."