Zee 24 Taas Impact: छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या Wikipedia वर मोठी कारवाई

सूत्रांच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाउंडेशनला किमान 10 ईमेल्स आणि नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.  

शिवराज यादव | Updated: Feb 21, 2025, 05:13 PM IST
Zee 24 Taas Impact: छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या Wikipedia वर मोठी कारवाई

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती देणाऱ्या विकिपीडियाच्या जवळपास 4 संपादकांविरोधात महाराष्ट्र सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीला 10 ईमेल्स आणि नोटीस पाठवूनही त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असणारी माहिती काढली नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव होते. सध्या 'छावा' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचा इतिहास पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित विकिमीडिया फाउंडेशन, जे मोफत ऑनलाइन माहिती पुरवतात त्यांना संभाजी महाराजांवरील मजकूर काढून टाकण्याची विनंती करणाऱ्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर फक्त स्वयंचलित उत्तर मिळालं आहे, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असं त्यांनी सांगितलं आहे. 

'झी 24 तास'ने  छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली होती. झी 24 तासनं हाती घेतलेल्या या मोहीमेला अखेरला मोठं यश आलं होतं. शंभूराजांबाबतचा तो खोडसाळ मजकूर हटवण्यात आला होता. झी २४ तासच्या मोहीमेनंतर सरकारनं कारवाईचे आदेश दिले होते. 

विकिपीडियावरील संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. झी 24 तासने सकाळी 10 वाजून 56 मिनिटांनी सर्वत प्रथम याबाबतची बातमी दाखवली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी झी 24तासच्या या मोहिमेची दखल घेतली होती. देवेंद्र फडणवीसांनी सायबर सेलचे IG यशस्वी यादव यांना तातडीनं मंत्रालयात बोलावून घेतले आणि विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल असलं लेखन खपवून घेतलं जाणार नाही यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

महाराष्ट्र सायबर सेलने सांगितलं आहे की, विकीपीडियाने दिलेला कंटेंट चुकीचा असून, राज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रचंड आस्था असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी माहिती नोटीसमध्ये दिली आहे. तसंच यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अवस्थता निर्मा होऊ शकत असल्याचंही नोटीसमधअये सांगण्यात आलं. 

विकिपीडियाने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69 आणि 79 चे उल्लंघन केल्यामुळे हा खटला दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.