Ajit Pawar : महाराष्ट्रात सध्या चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांमध्ये राजकारणातून काही नावांची चर्चा सुरू असून त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवारांचे दोन मंत्री विरोधकांच्या टार्गेटवर आहेत. त्यांची नावं आहेत धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे. या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांच्या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा फडणवीसांनी घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे.
राऊतच नव्हे तर, एखाद्यानं केलेल्या कृत्यामुळे संघटना, पक्ष आणि राज्याची बदनामी होत असेल तर राजीनामा दिला पाहिजे असा टोला सुप्रिया सुळे यांनीही लगावला आहे. दरम्यान यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय.
1995 मधील सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटेंना नाशिक न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान यानंतर लगेचच त्यांना जामीन देण्यात आला. मात्र, त्यांनी केलेल्या या फेरफारीचं बिंग फुटलंय ते एका बंदुकीसाठी केलेल्या अर्जामुळे.
बंदुकीसाठी अर्ज, कोकाटेंचं बिंग फुटलं!
1994 मध्ये कोकाटेंनी रोख रक्कम हाताळणीच्या सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अर्जानुसार आपल्याकडे 40 ते 50 कामगार काम करतात, असं त्यांनी परवान्यासाठी अर्ज करताना म्हटलं होतं. कामगारांना प्रत्येक आठवड्याला सुमारे नऊ हजार रुपये रोख स्वरुपात पगार द्यावा लागतो. पैशांच्या सुरक्षतेसाठी बंदुकीच्या परवान्याची मागणी कोकाटेंनी केली होती. दरम्यान यामुळे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न 30 हजार रुपयांहून कमी नसल्याचा निष्कर्ष तत्कालीन जिल्हा प्रशासनानं काढला. त्यामुळे कमी उत्पन्न दाखवून कोकाटेंनी कमी दरात सदनिका कशा मिळवल्या असा प्रश्न उपस्थित झाला आणि म्हणूनच माणिकराव कोकाटेंवर कागदपत्र फेरफार आणि फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली.
सुरुवातील बीड हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोप झालेल्या धनंजय मुंडेंवर आत कृषी खात्यात घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. सुरेश धस आणि अंजली दमानियांनी त्यांच्यावर हा गंभीर आरोप केलाय. 200 कोटींचा निधी वळवला, कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी 300 कोटींचा घोटाळा केला असेही आरोप त्यांच्यावर आहेत.
हेसुद्धा वाचा : बर्थडे गर्ल थोडक्यात बचावली; सटजावटीतील हायड्रोजनचा फुगा फुटला अन् उसळला आगडोंब, Video मन विचलित करणारा
राजीनामा आणि नैतिकतेच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकार आणि दादांच्या दोन्ही मंत्र्यांना घेरलंय. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असेलली विरोधकांच्या मागणीला यश मिळणार का? दादा, फडणवीस दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेणार की नाही? हे आगामी स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.