Viral Video : हल्ली वाढदिवस किंवा एखादा खास क्षण साजरा करण्याची वेळ येते तेव्हा त्या क्षणी सजावटीसाठी अनेक मंडळी फुग्यांच्या सजावटीचा पर्याय निवडतात. विविध रंगांचे, विविध आकारांचे हे फुगे अशा विशिष्ट आणि तितक्या विविध आकारांमध्ये रचले जातात की पाहणांची यावरच नजर खिळते. हायड्रोडनच्या फुग्यांपासून तयार होणाऱ्या या नव्या सजावटीचा सध्या चांगलाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. पण, उत्साहाला चार चाँद लावणारी हीच सजावत अतिउत्साहाच्या भरात जीवावर बेतू शकते ही वस्तूस्थिती नाकारतासुद्धा येत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण हा व्हिडीओ गोष्टी चुकल्या तर धोका नेमका तुम्हाला कुठवर पोहोचवू शकतो याचीच प्रचिती देऊन जात आहे. व्हिएतनामच्या हनोई प्रांतातील हा व्हिडीओ असून, तिथं एक महिला तिच्याच वाढदिवशी सजावटीच्या फुग्यामुळं झालेल्या स्फोटामुळं जखमी झाली.
14 फेब्रुवारी रोजी ही महिला फुगे आणि केकसह फोटोसाठी पोझ देत होती. त्याचवेळी अचानकच तिथं हायड्रोजनच्या फुग्याचा मोठा स्फोट झाला. या महिलेनंच सोशल मीडियावरून नेमकं काय घडलं याची माहिती दिली. जिथं तिनं सांगितल्यानुसार एका रेस्तराँमध्ये बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं असून, तिथं सजावटीसाठी अनेक फुगे लावण्यात आले होते. त्यात भरीस भर म्हणून तिनं स्वत:हूनसुद्धा काही फुगे खरेदी केले. तेच फुगे घेऊन एका हातात केक घेत ती फोटोसाठी उभी राहिली आणि आणि केकवर लावलेल्या मेणबत्तीच्या संपर्कात फुगा येताच त्याचा भयंकर स्फोट झाला.
हे सारंकाही इतक्या क्षणार्धात झालं की तिच्या हातचा केक तर खाली पडलाच पण, तिनं एकच किंकाळी फोडली. फुगा जळत्या मेणबत्तीच्या संपर्कात आल्यनं तो फुटला आणि हायड्रोजनसह रासायनिक प्रक्रिया होऊन एकच आगडोंब उसळला. तिनं लगेचच चेहरा पाण्यानं धुतला आणि तातडीनं पुढील उपचारांसाठी रुग्णालय गाठलं. चेहऱ्यावर यामुळं गंभीर दुखापत झाली असून, आपलं पुढील आयुष्य नेमकं कसं असेल याचीच तिला चिंता लागून राहिली. पण, डॉक्टरांनी दिलासा देत या जखमा प्राथमिक स्तरातील असून त्यांचे व्रण आयुष्यभरासाठी चेहऱ्यावर राहणार नाही असं म्हणत तिला दिलासा दिला.