Accused Threatened To Blow Up Ayodhya Ram Janmabhoomi Arrested: राम जन्मभूमी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पत्नीसहीत महाराष्ट्रातील अहमदनगरमधून अटक करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता राम जन्मभूमि (Ayodhya Ram Janmabhoomi) परिसराच्या आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या मनोज कुमारला एका फोन कॉलवरुन राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली होती.
अयोध्या पोलिसांनी तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती मिळाली. या व्यक्तीने राम जन्मभूमि मंदिर उडवून देण्याची धमकी का दिली याबद्दलचा खुलासा करताना आरोपीला त्याच्या गर्लफ्रेण्डच्या भावाला अडकवण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचं सांगितलं. गर्लफ्रेण्डच्या भावाच्या क्रमांकावरुन नेट कॉलिंगच्या माध्यमातून फोन करुन राम मंदिर उडवण्याची धमकी दिली. अयोध्येचे सर्कल ऑफिसर एस. के. गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज कुमारकडे ज्या क्रमांकावरुन फोन आला होता त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यावेळी असं दिसून आलं की अनिल रामदास घोडके उर्फ बाबा जान मूसा नावाच्या व्यक्तीने दिल्लीमधील बिलाल नावाच्या व्यक्तीला पोलिसांच्या कचाट्यात अडकवण्यासाठी नेट कॉलिंगच्या माध्यमातून त्याच्या नावाने धमकी दिली.
पोलिसांच्या टीमने अनिल रामदास घोडके आणि त्याच्या पत्नीला अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरातून अटक केली. अटक झाल्यानंतर रामदासने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी स्वत:ला चेन्नईचा रहिवाशी असल्याचं सांगितलं. तर नंतर तो स्वत:ला मूळचा महाराष्ट्राचा असल्याचं सांगू लागला.
पोलीस निरिक्षक मधुबन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज कुमारला पहाटे पाच वाजता एका अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. मनोजने कोण बोलतंय आणि कुठून बोलतंय असं विचारलं असता आपण दिल्लीवरुन बोलत असल्याचं सांगितलं. आज सकाळी दहा वाजेपर्यंत राम जन्मभूमी मंदिर उडवून देणार आहे, असं समोरच्या व्यक्तीने मनोजला सांगितलं.
अटक करण्यात आलेल्या मनोज आणि त्याच्या पत्नीकडून 9 मोबाइल फोन, लॅपटॉप, कुराणच्या दोन प्रती, दोन मुस्लीम टोप्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, चेक बूक, जन्माचा दाखला, इलेक्शन कमीशनचा फॉर्म, ताबीजच्या माळेबरोबरच मोठ्या प्रमाणात सामान सापडलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिलने यापूर्वीही अशाप्रकारची धमकी दिली होती. त्याने राम जन्मभूमीबरोबरच दिल्ली मेट्रो स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.