नवी दिल्ली: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगून परतलेला बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजपाल यादव याने गुरुवारी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष शीला दीक्षित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राजपाल यादव याने ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. या मतदारसंघातून भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी रिंगणात आहेत. त्यामुळे काँग्रेसने ईशान्य दिल्लीतून राजपाल यादवला उमेदवारी दिल्यास ही लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. राजपाल यादव लवकरच काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचीही भेट घेणार आहे. यानंतरच राजपाल यादवला काँग्रेसची उमेदवारी मिळणार की नाही, याचा अंतिम फैसला होईल.
आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षात (आप) बोलणी सुरु आहेत. अरविंद केजरीवाल युतीसाठी आग्रही असले तरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज तिवारी यांनी ईशान्य दिल्लीत काँग्रेसच्या जयप्रकाश अग्रवाल यांचा पराभव केला होता. मनोज तिवारी यांना जवळपास सहा लाख मते पडली होती.
Actor Rajpal Yadav arrives at Delhi Congress Chief Sheila Dikshit's residence in Delhi. pic.twitter.com/WvJt3RDkRu
— ANI (@ANI) April 4, 2019
कर्ज फेडू न शकल्यामुळे राजपाल यादव नुकताच तुरुंगवास भोगून बाहेर पडला होता. २०१० मध्ये त्याने चित्रपटाच्या निर्मितीसाठी एका कंपनीकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१८ मध्ये राजपाल यादवला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.