दिल्ली : दिल्लीसहीत संपूर्ण देशाला हादरवून टाकेल अशी एक घटना नुकतीच उघडकीस आलीय. २०११ साली घडवून आणण्यात आलेलं एक अपहरण आणि हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात पोलिसांनी तब्बल नऊ वर्षानंतर यश मिळालंय. २०११ साली २२ वर्षांचा असणाऱ्या रिक्षाचालक रवि याचा तुकड्यांमध्ये विखुरलेल्या मृतदेहाचे अंश गोळा करण्यात पोलिसांना यश आलंय. रवि याची हत्या त्याच्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं मिळून केल्याचंही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय.
या प्रकरणाची सुरुवात झाली ती २०१० साली. कमल हा अलवकर जिल्ह्यात कन्स्ट्रक्शनच्या कामावर होता. जवळच राहणाऱ्या शकुंतला नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम जडलं. शकुंतलाही त्याच्या प्रेमात होती. परंतु, तिच्या घरच्यांनी मात्र त्यांच्या प्रेमाला नकार देत शकुंतलाचं लग्न दिल्लीच्या समालखा भागात राहणाऱ्या रविशी लावून दिलं. रवि दिल्लीत रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता.
लग्नानंतर शकुंतला केवळ एक दिवस आपल्या पतीच्या घरी होती. त्यानंतर ती आपल्या माहेरी आली. यावेळी, तिची भेट पुन्हा कमलशी झाली. आपल्या प्रेमातील अडसर रवि आहे, त्याला मार्गातून दूर केल्यावर आपलं प्रेम यशस्वी होईल, अशा फिल्मी पण रक्तरंजित कल्पनेनं या दोघांच्या डोक्यात घर केलं.
त्यानंतर शकुंतला ताबडतोब आपल्या पतीच्या घरी गेली आणि आपल्या बहिणीच्या घरी जाणार असल्याचं भासवून तिनं रविला कमलच्या गाडीत बसवलं. यावेळी गाडी रविचा ड्रायव्हर गणेश चालवत होता. त्यांनी शकुंतला हिला तिच्या बहिणीच्या घरी उतरवून दिलं. त्यानंतर गाडीतच दोरीच्या साहाय्याने रविची गळा दाबून हत्या केली. या मृतदेहासह ते अलवरला पोहचले... आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर कमलनं आणि ड्रायव्हरनं हा मृतदेह पुरला.
मात्र, बेपत्ता रविचं प्रकरण काही दिवसांनंतर क्राईम ब्रान्चकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे, घाबरलेल्या कमलनं पुरलेला मृतदेह बाहेर करुन त्याचे तुकडे तुकडे करून जवळपास ७० किलोमीटरच्या भागांत विखुरले. परंतु, मृतदेहाचे अवशेष त्याच खड्यात राहिले.
पोलिसांना कमल आणि त्याच्या साथीदारांवर संशय होताच परंतु, त्यांच्याकडे पुरावे नव्हते. त्यामुळे, त्यांनी आरोपींची पोलीग्राफी टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्टही करून पाहिली. परंतु, हाती काहीच लागलं नाही. नार्को चाचणीसाठी आरोपी तयार झाले नाहीत. परंतु, ब्रेन मॅपिंग दरम्यान आरोपी चकमा देत असल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं.
आता तब्बल ९ वर्षानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय. सध्या, रविची आरोपी पत्नी फरार आहे. तर तिचा प्रियकर कमल आणि ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविच्या मृतदेहाची २५ हाडं जप्त करण्यात आलीत. त्यांना डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आलंय.