नवी दिल्ली: काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे आता त्यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर गंडांतर आले आहे. केवळ ज्योतिरादित्य सिंधियाच नव्हे तर महाराष्ट्र राजस्थान आणि हरियाणातील काँग्रेस नेते पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या व्हॉटसअॅप आणि सोशल मीडियावर भाजप समर्थकांकडून 'सिंधिया तो झांकी है, अभी आधा दर्जन टॉप नेता बाकी हैं' असा संदेश फिरवला आहे.
काँग्रेसही आक्रमक; ज्योतिरादित्य सिंधियांची पक्षातून हकालपट्टी
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेसमधून २० आमदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित आहे. सिंधिया यांच्या राजीनाम्याचा परिणाम देशाच्या इतर राज्यांमध्येही होईल, असे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर नाराज असलेले महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानमधील काही बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पावलावर पाऊल ठेवू शकतात.
मोठी बातमी: ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा मोदींच्या भेटीला
दरम्यान, काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये जाणार किंवा स्वतंत्र पक्ष काढणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया भाजप मुख्यालयात जाऊन पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या भेटीनंतर ते दिल्लीतील स्वत:च्या निवासस्थानी आले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाविषयी अद्यापही साशंकता आहे. परंतु, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तरी भाजपकडून त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तसेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही मिळू शकते.