Air India Peeing Incident : मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालकांनी (Directorate General of Civil Aviation) एअर इंडियावर मोठी कारवाई केली आहे. एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात (Air India Slapped with 30 Lakh Fine) आला असून तीन महिन्यांसाठी पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासह कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सेवेवरही तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गतवर्षी 26 नोव्हेंबरला महिला प्रवाशावर लघुशंका केल्याप्रकरणी एअर इंडियाने प्रवासी शंकर मिश्रावर चार महिन्यांची बंदी घातली आहे. याआधी त्याच्यावर 30 दिवसांची बंदी घालण्यात आली होती. 4 जानेवारीला ही घटना डीजीसीएच्या समोर आली आणि त्यानंतरच अनेक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात झाली.
डीजीसीएने एअर इंडियाचे खातेदार व्यवस्थापक, एअर इंडियाच्या इन-फ्लाइट सर्व्हिसेसचे संचालक आणि त्या विमानातील सर्व पायलट आणि केबिन क्रू मेंबर्स यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा त्यांना करण्यात आली आहे. उत्तर देण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. टाटाकडे मालकी असणाऱ्या एअर इंडियाने आपली बाजू डीजीसीएकडे मांडली आहे.
दरम्यान शंकर मिश्रा याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून महिलेनेच स्वत:वर लघुशंका केल्याचा दावा केला आहे. शंकर मिश्राचा दावा महिलेने फेटाळला असून हे अत्यंत खोटं आणि आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं आहे.
महिन्याच्या सुरुवातीला टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाने लवकर प्रतिसाद द्यायला हवा होता हे मान्य केलं आहे. यानंतर एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी माफी मागितली होती. विमानात प्रवाशांना मद्य पुरवण्याच्या धोरणावर आपण पुनर्विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
शंकर मिश्रा याने 26 नोव्हेंबरला न्यूयॉर्क-दिल्ली विमानात मद्यधुंद अवस्थेत महिलेवर लघुशंका केली होती. 27 नोव्हेंबरला महिलेने एअर इंडिया ग्रुपच्या चेअरमनला पत्र लिहून सगळा प्रकार सांगितला. ४ जानेवारीला एअर इंडियाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंनी आपापसात चर्चा करुन वाद मिटवला असल्याचं वाटल्याने आपण इतके दिवस पोलिसांकडे गेलो नव्हतो असा दावा एअर इंडियाने केला. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्राला अटक केली.