वर्षातून 5 आठवडे सुट्टी, Flexible work hours अन्..., भारतात 'या' 8 गोष्टी करा; बिझनेसमनची मागणी

90 Hour Work Week Debate: आठवड्यातील 90 तास कर्मचाऱ्यांनी काम करावं या मुद्द्यावरुन सध्या वाद सुरु असतानाच भारतामधील कर्मचाऱ्यांसंदर्भात नवं धोरणं अवलंबलं जावं अशी मागणी करण्यात आलीये.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 17, 2025, 08:45 AM IST
वर्षातून 5 आठवडे सुट्टी, Flexible work hours अन्..., भारतात 'या' 8 गोष्टी करा; बिझनेसमनची मागणी title=
सोशल मीडियावरुन नोंदवली प्रतिक्रिया (प्रातिनिधिक फोटो)

90 Hour Work Week Debate: आरपीजी इंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी भारताने आता डेन्मार्ककडून प्रेरणा घेत खासगी क्षेत्रातील कामाची पद्धत बदलली पाहिजे असं मत व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करुन आणि कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं हर्ष गोयंका यांचं म्हणणं आहे. भारतामध्ये आठवड्यातून 90 तास काम केलं पाहिजे यावरुन वाद सुरु असतानाच गोयंका यांनी डेन्मार्क मॉडेल राबवण्याचा सल्ला दिला आहे. 

नोकरी गेली तर सरकार करतं मदत

गोयंका यांनी डेन्मार्कमधील कर्मचारी हे स्वतंत्रपणे कोणतेही सूक्ष्म स्तरावरील नियोजन नसतानाही उत्तम काम करतात याकडे लक्ष वेधलं आहे. डेन्मार्कमधील कर्मचाऱ्यांना वर्षभरातून पाच आठवडे भरपगारी सुट्टी मिळते. तसेच सहा महिन्यांचा कालावधी हा मॅटर्निटी लिव्ह म्हणून दिला जातो. कामाचे फ्लेक्जीबल तास असल्याने डेन्मार्कमधील कर्मचाऱ्यांना प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात समतोल राखता येतो. तसेच नोकरी गेल्यास तेथील सरकार काही मदतही देऊ करते, असंही गोयंका यांनी म्हटलं आहे.

भारतासाठी काही धडे

गोयंका यांनी डेन्मार्कसारख्या वर्क कल्चरमध्ये कामाची साचेबद्ध उतरंडी म्हणजेच हायरारकी नसते, असंही नमूद केलं आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. म्हणूनच "लॉटरी लागल्यानंतरही डेन्मार्कमधील लोक काम करतात," अशी आठवण गोयंका यांनी करु नदिली आहे. तसेच डेन्मार्कमधील कंपन्या कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्याला प्राधान्य देतात. तसेच एकत्रित एखादं ध्येय साध्य करण्यास वैयक्तिक टार्गेटपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं, असं गोयंका यांनी म्हटलं आहे. "हे भारतासाठी काही धडे आहेत," असं गोयंका यांनी या यादीबद्दल केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेमका वाद कसा सुरु झालाय?

काही दिवसांपूर्वीच बांधकाम आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी असलेल्या 'लार्सन अँड टुब्रो' म्हणजेच 'एल अँण्ड टी'चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेण्यासंदर्भात केलेल्या विधानानं चर्चेचं गुऱ्हाळ सुरु झालं. सुब्रमण्यन यांना एका कार्यक्रमादरम्यान 'लार्सन अँड टुब्रो'ची अब्जावधींची उलाढाल असूनही इथल्या कर्मचाऱ्यांना शनिवारीसुद्धा कामावर यावं लागतं, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. तसेच रविवारी घरी बसून किती वेळ बायकोला पाहत राहणार त्याऐवजी कर्मचाऱ्यांनीह रविवारीही काम केलं पाहिजे असंही मत नोंदवलं. "मला खंत आहे की मी लोकांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकत नाही. मी त्यांना रविवारीसुद्धा कामावर बोलवू शकतो तर मला नक्कीच आनंद होईल' असं आश्चर्यकारक उत्तर एसएन सुब्रमण्यन यांनी दिलं. यावरुनच ते टीकेचे धनी ठरत आहे. असं असतानाच आता गोयंका यांनी हे नवं आणि अधिक कर्मचारीधार्जिण धोरण राबवण्याचा सल्ला दिला आहे.