नवी दिल्ली: पंजाबच्या अमृतसर येथे रावण दहनाच्यावेळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातामागील अनेक हदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत. या अपघातात ५९ जणांचा मृत्यू झाला.
हा कार्यक्रम पाहण्यासाठी हे लोक रेल्वे रूळावर गर्दी करून उभे होते. यावेळी एक्स्प्रेस गाडीने अनेकांना उडवले.
यावेळी स्थानिक रामलीलेच्या कार्यक्रमात रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंह याने आठ लोकांचे प्राण वाचवले. ही दुर्घटना घडली तेव्हा दलबीरचा एक मित्र त्याच्यापासून काही अंतरावरच उभा होता. त्याने सांगितले की, रामलीलेच्या कार्यक्रमानंतर दलबीर ट्रॅकच्या पलीकडे असणाऱ्या आपल्या घरी निघाला होता. यावेळी त्याने समोरून जालंधर-अमृतसर एक्स्प्रेस भरधाव वेगात येताना पाहिली.
गाडी येत असल्याचे पाहून दलबीरने आठ जणांना ट्रॅकवरून बाजूला ढकलले. मात्र, तो स्वत: गाडीखाली खेचला गेला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
गेल्याच वर्षी दलबीरचे लग्न झाले होते. त्याला आठ महिन्यांची लहान मुलगीही होती. या दुर्घटनेनंतर दलबीरच्या आई व पत्नीने त्याचा अंत्यसंस्कार करायला नकार दिला.
राज्य सरकारने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. दलबीर कुटुंबातील एकमेव कमवाती व्यक्ती होती. त्यामुळे आम्हाला योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी दलबीरच्या कुटुंबीयांन केली.