Society WhatsApp Group: दिल्लीमध्ये मॉरल पोलिसींगचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील एक तरुण त्याच्या प्रेयसीचा हात पकडून गार्डनमध्ये फिरताना दिसल्यानंतर तो ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटी ग्रुपमधील सदस्य धमकीचे मेसेज पाठवत असल्याचा आरोप केला जात आहे. ज्या तरुणाबरोबर हा प्रकार घडला तो केवळ 20 वर्षांचा असून त्याने सोसायटी व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये सदस्य 'त्याला धडा शिकवू' असं म्हणताना तसेच गरज पडल्यास पोलिसांना बोलवण्याबद्दल बोलताना दिसत आहेत.
"हे पोस्ट करावं की नाही याबद्दल मला शंका होती मात्र सध्या यामुळे मी प्रचंड तणावात आहे. मी सामान्यपणे माझ्या गर्लफ्रेण्डबरोबर सोसायटी जवळच्या गार्डनमध्ये सांयकाळी फेरफटका मारतो. आम्ही बाकड्यावर बसून गप्पा मारत असतो. रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही इथे असतो. आम्ही कधीच चारचौघात न करता येणाऱ्या गोष्टी केलेल्या नाहीत. आम्ही फक्त हात पकडून फिरत असतो आणि एकमेकांच्या बाजूला बसतो," असं या तरुणाने म्हटलं आहे. या व्यक्तीने आमचं हे वागणं 'असभ्य वर्तन' असल्यावरुन सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चर्चा सुरु आहे, असं सागत तरुणाने ग्रुपवरील मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केलेत.
स्क्रीनशॉटमधील एका मेसेजमध्ये, "एक मुलगा आणि मुलगी बागेमध्ये रात्री बसलेले दिसतात. त्यांचं हे वागणं योग्य नाही," असं एका सदस्याने म्हटलं आहे. या वागण्यामुळे इतरांची चिंता वाढल्याचंही या व्यक्तीने म्हटलं आहे. ग्रुपवरील या मेसेजनंतर इतर सदस्यही सक्रीय झाले आणि त्यांनी हे जोडपं नेमकं काय करतं याची व्हिडीओ रेकॉर्डींग केली पाहिजे असं म्हटलं. या रेकॉर्डिंगवरुन ते काही आक्षेपार्ह करत नाहीत ना हे तपासून पाहता येईल असं म्हटलं आहे. "अशा बेजबाबदार तरुणांची लाज काढली पाहिजे," असं एकाने ग्रुपमध्ये म्हटलं आहे.
सोसायटीच्या सुपरव्हायझरला हे प्रकरण कळवून या जोडप्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. "यानंतरही परिस्थिती सुधरली नाही तर पोलिसांना कळवूयात," असा सल्ला एका सदस्याने सोसायटी ग्रुपवर दिला.
मात्र हा सारा प्रकार भयानक असल्याचं या मुलाने म्हटलं आहे. अनेकजण आमच्या पालकांना लक्ष्य करत होते. आमच्या पालकांनी कशापद्धतीने आमचं पालनपोषण करण्यात कसूर ठेवला याबद्दल काहीजण बोलत होते. एकजण आमचा व्हिडीओ शूट करुन ऑनलाइन व्हायरल करण्याबद्दल बोलत होता. मात्र प्रत्यक्षात आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही किंवा आमचं वागणं अयोग्य असल्याबद्दल काहीही बोललेलं नाही, असं या तरुणाने म्हटलं आङे.
रेडीटवर ही पोस्ट समोर आल्यानंतर अनेकांनी या मॉरल पोलिसींगचा विरोध केला आहे. अनेकांनी या तरुणालाच पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला आहे.