SC, ST उमेदवारांना कितीही वेळा MPSC परीक्षा देण्याची मिळणारी मुभा मनमानी नाही; विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली

राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा देण्याबाबत अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करणारी अपंग उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.   

वनिता कांबळे | Updated: Feb 12, 2025, 11:18 PM IST
SC, ST उमेदवारांना कितीही वेळा MPSC परीक्षा देण्याची मिळणारी मुभा मनमानी नाही; विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली  title=

MPSC Exam SC, ST Students Age Limit : राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या परीक्षा देण्याबाबत अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करणारी अपंग उमेदवाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. अनुसूचित जाती-जमातीला राज्यघटनेने विशिष्ट प्रवर्गाचा दर्जा दिला असून त्यांना आरक्षण देताना काही निकष निश्चित केले आहेत. त्यामुळे, या निकषांना मनमानी म्हणता येणार नसल्याचा निर्वाळाही न्यायालयाने या प्रकरणाच्या निमित्ताने दिला.

अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना एमपीएससी परीक्षा कितीवेळा द्यावी याची मर्यादा घालण्यात आलेली नाही. परंतु, हा एकप्रकारे भेदभाव आहे, असा दावा करून मुंबईस्थित धर्मेंद्र कुमार (३८) यांनी या निकषाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने मात्र उपरोक्त बाब स्पष्ट करून कुमार यांची याचिका फेटाळली. अनुसूचित जाती-जमाती हा ओबीसींपेक्षा वेगळा वर्ग होता आणि म्हणूनच त्यांच्यासाठी वेगवेगळे निकष निर्धारित केले गेले आहेत. त्यामुळे, अशा निकषांना मनमानी म्हणता येणार नाही.

अनुसूचित जाती-जमाती हा स्वतंत्र प्रवर्ग असून त्याला संविधानाने मान्यता दिली असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले. आरक्षणाचा विचार करता संविधानाने ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमात हे दोन स्वतंत्र वर्ग मानले आहेत. त्यामुळे. ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती स्वतःची तुलना अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तीशी करू शकते याची कल्पना केली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. राज्य लोकसेवा परीक्षांसाठी हा फरक कायम ठेवण्यात आला असून अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांना कितीही वेळा परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. याउलट, ओबीसी उमेदवार आणि अपंगत्व असलेल्या व्यक्तींना नऊ प्रयत्नांचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.