बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे

Updated: Jan 22, 2021, 02:47 PM IST
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का title=

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. 

राजीव बॅनर्जी यांनी राजीनाम्यात म्हटलं की, 'बंगालच्या लोकांची सेवा करणं त्यांच्यासाठी अभिमानास्पद होतं. या संधीसाठी सगळ्यांचे आभार.' बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी अनेक जण तृणमुल काँग्रेस सोडून जात आहेत. राजीव बॅनर्जी यांच्याआधी आणखी २ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

बंगालमधील मोठे नेते सुवेंदु अधिकारी यांनी नोव्हेंबरमध्ये परिवहन मंत्री पदाचा राजीनामा देत नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लक्ष्मी रत्न शुक्ला यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तृणमूल काँग्रेसचे अनेक आमदार आणि स्थानिक नेते भाजपमध्ये जात आहेत. राजीव बॅनर्जी हे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

नंदीग्रामनंतर बंगालमधील बहुचर्चित सिंगुरचे तृणमूल काँग्रेसचे आमदार रवींद्र नाथ भट्टाचार्य यांचे पुत्र तुषार कांति भट्टाचार्य हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत.

सुवेंदु यांनी म्हटलं की, तुषार कांति भट्टाचार्य यांनी मला संपर्क केला होता. त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा वर्तवली आहे. तुषार कांति भट्टाचार्य यांनी देखील ही गोष्ट स्वीकारली आहे.