नवी दिल्ली: आगमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाचा (आप) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. त्यानुसार आगामी काळात दिल्लीतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देण्यात येईल. सध्याच्या घडीला दिल्लीतील सरकारी नोकऱ्यांमध्ये राज्याबाहेरून आलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी दिल्लीतून शिक्षण घेणाऱ्यांना नोकऱ्यांमध्ये ८५ टक्के आरक्षण देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी यंदाची लोकसभा निवडणूक ही देशाला वाचवण्यासाठीची निवडणूक असल्याचे म्हटले. भारताने आजपर्यंत अनेक हल्ले सहन केले. मात्र, आता भारताच्या एकतेवरच प्रहार केला जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही एकट्यादुकट्या पक्षाची राहिलेली नाही. मोदी-शहा यांनी सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal and Deputy Chief Minister Manish Sisodia release Aam Aadmi Party's Delhi manifesto #LokSabhaElections2019 pic.twitter.com/G9sftox4yg
— ANI (@ANI) April 25, 2019
तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती का होऊ शकली नाही, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. युतीची चर्चा ही ट्विटरवर होऊ शकते का? जर मोदी-शहा पुन्हा सत्तेत आले तर त्यासाठी केवळ गांधीच जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी केजरीवाल यांनी दिला.
काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना युतीबाबत निर्वाणीचा इशारा दिला होता. दिल्लीत भाजपचे उच्चाटन करण्यासाठी काँग्रेस-'आप'ची युती गरजेची आहे. काँग्रेस दिल्लीतील चार लोकसभा मतदारसंघ 'आप'साठी सोडायला तयार आहे. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे. 'आप'साठी आमचे दरवाजे उघडे आहेत, पण वेळ हातातून निसटत चालला आहे, हे ध्यानात राहू द्या, असे राहुल यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर काँग्रेस-आप युती प्रत्यक्षात येऊ शकली नाही.