हैदराबाद: असदुद्दीन ओवेसी हे सर्कशीतील विदुषकासारखे दिसतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला विदुषकाप्रमाणे उलटे टांगू, अशा शब्दांत भाजप खासदार धर्मपुरी अरविंद यांनी पुन्हा एकदा ओवेसींवर हल्ला चढवला. ओवेसी हे मुस्लिम मतांचे दलाल आहेत. यापूर्वी काँग्रेस त्यांना मुस्लिमांची मते फोडण्यासाठी पैसे देत असे. आता ते तेलंगणा राष्ट्र समितीकडून (TRS)पैसे घेतात, असा आरोपही यावेळी धर्मपुरी अरविंद यांनी केला. धर्मपुरी अरविंद यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे हैदराबादमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता ओवेसी या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Arvind Dharmapuri,BJP MP on his statement 'Will hang Owaisi upside down': You(Asaduddin Owaisi) look like a clown so you will be hung upside down, clowns do this in circuses. You are broker of Muslim votes,earlier Congress used to pay you more for your brokerage,now TRS pays more pic.twitter.com/ga0EsExjAI
— ANI (@ANI) January 7, 2020
यापूर्वी धर्मपुरी अरविंद यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (CAA) विरोध न करण्याचा इशाराही दिला होता. मी असदुद्दीन ओवेसी यांना शेवटचा इशारा देतो. अन्यथा मी त्यांना क्रेनला उलटा टांगेन आणि त्यांची दाढी भादरून टाकेन. ही दाढी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना लावून मी ओवेसींना बढती देईन, असे धर्मपुरी यांनी म्हटले होते.
असदुद्दीन ओवेसी म्हणतात की, नागरिकत्व सुधारणा कायदा असंवैधानिक आणि धार्मिक आहे. ते देशात फूट पाडण्यासाठी सभा घेत आहेत. ते पाकिस्तान आणि बांगलादेशच्या लोकांसाठी लढा देत आहेत का? ओवेसींची कृती ही राष्ट्रविरोधी आहे. त्यामुळे ओवेसींना तुरुंगात डांबले पाहिजे, अशी मागणीही धर्मपुरी यांनी केली होती.