उन्नाव : भाजपा नेते आणि उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाचं काम येत्या ६ डिसेंबरपासून सुरू होईल, असं म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, अयोध्या प्रकरण अजूनही कोर्टाच्या अखत्यारीत आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अजून सुरक्षित आहे. परंतु, साक्षी महाराज यांनी मात्र राम मंदिराच्या निर्माणाची भविष्यवाणी करून टाकलीय. ६ डिसेंबर ही तीच तारीख आहे ज्या दिवशी १९९२ साली अयोध्येत बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात आली होती.
सगळ्या जगाच्या, सर्व हिंदूंच्या आणि मी तर म्हणेन की सर्व देवी-देवतांच्याही नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. सुन्नी वक्फ बोर्डाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय.
येत्या चार आठवड्यांत जो निर्णय येईल, तो रामाच्याच बाजुनं असेल, असं सांगायला ते विसरले नाहीत. अयोध्येत दोन वेळा दिवाळी साजरी होणार आहे. एक दिवाळी प्रभू श्रीराम वनवासातून परतल्याच्या निमित्तानं साजरी केली जाते. तर दुसरी आता रामाच्या पक्षात निर्णय आल्यानंतर साजरी केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.
अयोध्या प्रकरणात सर्व पक्षकारांकडून युक्तीवाद बुधवार पूर्ण झाला. त्यानंतर आता सर्वेोच्च न्यायालयानं निर्णय सुरक्षित ठेवलाय. परंतु, हा निर्णय १७ नोव्हेंबरच्या आधीच येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होणार आहेत. तेच या प्रकरणासाठी गठित करण्यात आलेल्या पीठाचे अध्यक्ष आहेत. तब्बल ४० दिवसांपर्यंत चाललेली अयोध्य प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झालीय. कोर्टानं 'मोल्डिंग ऑफ रिलीफ'वर सर्व पक्षांना लिखित स्वरुपात आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय.