'...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...'

I Can Finish Lawrence Bishnoi Gang Says MP: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर एका खासदाराने थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपूर्ण टोळीचा आपण खात्मा करु शकतो असं विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 14, 2024, 07:28 AM IST
'...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...' title=
सोशल मीडियावरुन हल्लाबोल (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

I Can Finish Lawrence Bishnoi Gang Says MP: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे येथे त्यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकूण सहा आरोपींची ओळख पटवली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य तिघांचा शोध घेण्यासाठी आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 15 तुकड्यांची निर्मिती करुन त्यांना देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतली आहे.

बाब सिद्दीकींची हत्या सलमानशी मैत्री असल्याने?

बाबा सिद्दीकी यांचं सलमान खानशी खास नातं होतं. माजी मंत्री असलेले सिद्दीकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते. त्यातूनच बिश्नोई टोळीने त्यांची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. मागील दोन वर्षांमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने घडवून आणलेली ही तिसऱ्या नामांकित व्यक्तीची हत्या आहे. यापूर्वी गायक सिदू मुसेवाला, करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंग यांचीही बिश्नोई गँगने हत्या केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता एका खासदाराने 24 तासांमध्ये बिश्नोई टोळीचा खात्मा आपण करु शकतो असं म्हटलं आहे.

खासदार म्हणतो बिश्नोई टोळी संपवेन

लॉरेन्स बिश्नोई टोळीने मुंबईमध्ये यापूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता. मात्र मुंबईत लॉरेन्स बिश्नोई टोळीने एखाद्याची हत्या करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हत्येमुळे देशाच्या आर्थिक राजधानीमधील सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली जात असतानाच खासदार पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीला आपण संपवू शकतो असं म्हटलं आहे. 'एक आरोपी तुरुंगात बसून लोकांची हत्या करतो आणि सर्वजण शांत बसून केवळ पाहत आहेत. कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचा प्रमुख आता एक उद्योपती आणि राजकीय नेत्याची हत्या केली,' असं म्हणत पप्पू यादव यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी, "कायद्याने परवानगी दिली तर 24 तासांमध्ये या लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुन्हेगाराचं पूर्ण नेटवर्क संपवून टाकेन," असंही म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Baba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'

अनेकांनी पप्पू यादव यांना दोन महिन्यांपूर्वीच्या मागणीची करुन दिली आठवण

दरम्यान, पप्पू यादव यांच्या या पोस्टवरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्याचं कमेंट्समध्ये दिसत आहे. अनेकांनी त्यांनी वापरलेली भाषा योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी दोन महिन्यांपूर्वी पप्पू यादव यांनीच सुरक्षा मागितली होती यासंदर्भातील बातम्यांचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहे. "पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशा मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना लिहिलं आहे. त्यांनी झेड दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच पप्पू यादव यांनी बिहारमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे," असा मजकूर या बातमीच्या स्क्रीनशॉटमध्ये आहे.

कोण आहे पप्पू यादव?

पप्पू यादव हे त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी ओळखले जातात. त्यांनी 1990 च्या दशकामध्ये रजाकराणात प्रवेश केला. त्यांनी 1991, 196, 1999, 2004, 2014, 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकली आहे. विशेष म्हणजे त्यांनी वेगवगेळ्या पक्षांकडून निवडणूक लढून त्या जिंकल्या आहेत. यामध्ये समाजवादी पार्टी, लोक जनशक्ती पार्टी, आणि राष्ट्रीय जनता दलसारख्या मोठ्या पक्षांचा समावेश आहे. 2015 मध्ये पप्पू यादव यांनी जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) या पक्षाची स्थापना केली. मात्र यामधून त्यांना विशेष प्रभाव पाडता आला नाही. अखेर त्यांनी 20 मार्च 2024 रोजी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.