Shocking News : राजस्थान नेहमी आगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी चर्चेच असतं. राजस्थानच्या कामा शहरात नुकत्याच एका बाळाचा जन्म झाला. डीग जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात एक मुलगी जन्माला आली, तिला सामान्य लोकांसारखी 20 बोटं नसून एकूण 26 बोटं आहेत. नवजात मुलीच्या दोन्ही हातात 7-7 बोटे आहेत आणि दोन्ही पायात 6-6 बोटे आहेत. त्यामुळे बाळाचा जन्म होताच सगळीकडे त्याची चर्चा होऊ लागली.
वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना असल्याचा दावा डॉक्टरांकडून केला जातोय. डॉक्टर याला अनुवांशिक विसंगती मानत असले तरी लोकांनी या मुलीला डोक्यावर घेतलंय आणि ही मुलगी दैवी अवतार असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. अशी प्रकरणे क्वचितच आढळतात. त्यामुळे लोकांमध्ये कौतुहलाचं वातावरण आहे. 26 बोटांनी जन्माला आलेल्या मुलीची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. नवजात मुलीचे कुटुंबीय तिला ढोलगड देवीचा अवतार मानून आनंदोत्सव साजरा करत आहेत.
गोपीनाथ मोहल्ला येथे राहणाऱ्या गोपाल भट्टाचार्य यांची 8 महिन्यांची गर्भवती पत्नी सरजू देवीला काल रात्री अचानक प्रसुतीच्या वेदना होत होत्या. त्यानंतर देवीला रुग्णालयात नेण्यात आलं. गोपाल भट्टाचार्य हे सीआरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. तर त्यांची पत्नी मजूर म्हणून काम करत होती. पत्नीने मुलीला जन्म दिला तेव्हा डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. मुलीला 26 बोटं असल्याचं डॉक्टरांनी पालकांना सांगितलं. त्यानंतर कुटुंबीय खूप आनंदी असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, मुलगी आणि आई दोघीही सुखरूप आणि निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अशा केस दृर्मिळ असतात, अशी माहिती कामा रुग्णालयाचे डॉक्टर बी सी एस सोनी यांनी दिली आहे. मात्र, 26 बोटांचं बाळ बघण्यासाठी आता बघ्यांची गर्दी झाल्याचं दिसून येतंय. मागील काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात देखील अशी एक केस पहायला मिळाली होती. जळगावच्या यावल तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात एका महिलेने 26 बोटांच्या मुलाला जन्म दिला होता.