नवी दिल्ली : इ-कार या पेट्रोल-डिझेल कारपेक्षा स्वस्त नसणार असं मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी म्हटलंय.
मारुती सुझुकी ही देशातली सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. देशात विकल्या जाणाऱ्या दोनपैकी एक कार ही मारुतीची असते. मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी असं मत मांडलय की नजिकच्या काळात तरी इ-कार या पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा स्वस्त पर्याय असणार नाहीत.
इलेक्ट्रिक कार ही पर्यावरणपूरक जरी असली तरी ती व्यवहार्य नाही. या बाबतीत अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. ग्राहकांना परवडणारा पर्यायच लोकप्रिय होतो. त्यामुळे जरी सरकार इ-कार बाबत आग्रही असलं तरी लहान, स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवणं हे एक आव्हानच असल्याचं मत मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल कारचं महत्व राहिलचं असंही ते म्हणाले.
कमी खर्चात इ-कार बनवण्यासाठी मारुतीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी बॅटरीपासून कारला लागणाऱ्या लहान मोठ्या भागांचं उत्पादन भारतातच करण्याचा मारुतीचा प्रयत्न आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊनच इ-कार बाजारात आणण्याची मारुतीची योजना आहे.