पटना : बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा झटका बसला आहे. राजदच्या पाच विधानपरिषद सदस्यांनी (एमएलसी) पक्ष सोडला आहे. याशिवाय राजदचे उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय प्रसाद, करीम आलम, राधाचरण सेठ, रणविजय सिंह आणि दिलीप राय यांनी एमएलसी पदाचा राजीनामा दिला आहे. विधानपरिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांनी याची पुष्टी केली आहे. हे पाच नेते आता नितीशकुमार यांच्या पार्टी जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
राजीनामा देणारे सर्व विधान परिषद सदस्य (एमएलसी) लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. आरजेडीच्या सध्याच्या वंशाच्या राजकारणामुळे आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाला ते कंटाळले होते अशी माहिती आहे. वास्तविक, 7 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणुका होणार आहेत. आरजेडीकडून तेज प्रताप यादव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
आरजेडीकडे असलेल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे 9 पैकी 3 जागांवर आरजेडीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे तेजप्रताप यादव यांचा विजय निश्चित आहे. पण तेजप्रताप यादव यांना विधानपरिषदेत पाठवल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. या नाराज नेत्यांपैकी ५ विधानपरिषदेचे सदस्य आहेत आणि ते पक्ष सोडणार आहेत.
विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी होणारी विधानपरिषदेची निवडणूक सेमीफायनल मानली जाते. विधानसभेच्या सदस्यांच्या संख्येच्या आधारे 9 एमएलसी निवडून जाणार आहेत. अशा परिस्थितीत विधान परिषदेसाठी 27 आमदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. अशा प्रकारे तीन राजद आणि एक काँग्रेस सदस्य निवडून येण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागा जिथे निवडणुका होणार आहेत, त्याचा कार्यकाळ मेच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाला आहे. मंत्री अशोक चौधरी, विधानपरिषदेचे कार्याध्यक्ष हारुन रसीद, हिरा प्रसाद बिंद, पीके शाही, सतीश कुमार, सोने लाल मेहता, कृष्णा कुमार सिंग, राधा मोहन शर्मा आणि संजय प्रकाश यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.