'...तर पश्चिम बंगालमध्ये भयमुक्त वातावरणात निवडणूक अशक्य'

भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन, कैलास विजयवर्गीय यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अन्य आयुक्त यांची भेट घेतली.

Updated: Feb 4, 2019, 01:36 PM IST
'...तर पश्चिम बंगालमध्ये भयमुक्त वातावरणात निवडणूक अशक्य' title=

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभाराविरोधात भाजपच्या नेत्यांनी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे औपचारिकपणे तक्रार दाखल केली. स्वतंत्रपणे, निष्पक्षपातीपणे आणि भयमुक्त वातावरणात लोकसभेच्या निवडणुका होण्यासाठी आवश्यक वातावरण पश्चिम बंगालमध्ये नाही. त्यामुळे तेथील परिस्थितीची निवडणूक आयोगाने पाहणी करावी आणि निवडणुकीच्या काळात केंद्रीय दलाच्या जास्त तुकड्या तिथे नेमाव्यात, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. एकूणच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेला भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. 

भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन, कैलास विजयवर्गीय यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि अन्य आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी पश्चिम बंगालमधील परिस्थितीबद्दल त्यांना माहिती देण्यात आली आणि यामध्ये लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये अराजकतेसारखे वातावरण सध्या आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात येत आहे. त्याचबरोबर भाजपच्या कार्यक्रमांना सरकारकडून विरोध केला जात आहे. कार्यक्रमांना आवश्यक परवानग्या देण्यात येत नाहीत. भाजपच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर पश्चिम बंगालमध्ये उतरू दिले जात नाही. त्याचबरोबर या कार्यक्रमाला जाणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर काही जणांकडून हल्ले केले जात आहेत. अशा स्थितीत पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे, भयमुक्त वातावरणात निवडणूक होणे शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने परिस्थितीची पाहणी करावी आणि निवडणुकीच्या काळात लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी केंद्रीय दलाच्या जादा तुकड्या तैनात करण्यात याव्यात. तृणमूल काँग्रेसच्या हिंसक कारवायांना अटकाव घातला गेला पाहिजे, तरच तिथे मुक्तपणे निवडणूक पार पडेल, असे भाजपच्या नेत्यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. तृणमूल काँग्रेसचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही, असाही आरोप करण्यात आला. अजून निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झालेली नाही. तरीही निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाकडून करण्यात आली.